महिला इंटर्न डॉक्टरच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
व्हिसेरा अहवालानंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टर गौरी नारायणन (वय 24, केरळ) हिने आत्महत्या केल्याचा संशय असला तरी अद्याप मृत्यूचे ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण गुलदस्त्यात राहिल्याने सध्या खळबळ माजली आहे. व्हिसेरा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढील कारवाई होईल. तोपर्यंत पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली असल्याचे पोलिससूत्रांनी सांगितले. शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गौरीच्या मृत्यूची माहिती मिळताच तिचे नातेवाईक गोव्यात दाखल झाले. त्यानंतर काल गुऊवारी संध्याकाळी तिच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली असली तरी याबाबत तपासकाम सुऊ आहे. गौरी नारायणन इंटर्न डॉक्टरचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी दोनापावला हवाई समुद्रकिनाऱ्यावर सापडला होता. संध्याकाळी 6.30 वा.च्या दरम्यान पणजी पोलिसस्थानकात माहिती मिळताच पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक, उपविभागीय अधिकारी यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
मृत्यूपूर्वी आईसोबत मोबाईलवर संभाषण
मृत्यूची घटना घडली त्या संध्याकाळी गौरी नारायणन 4.30 वा.च्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर पोचली होती. त्या अगोदर ती आपल्या आईसोबत फोनवर बोलली होती. आपली प्रकृती ठिक नसल्याचे तिने आईला सांगितले होते. त्यानंतर तिने मानसिक तणाव विकाराची औषधे घेतली होती. त्याबाबतचे काही पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. ती राहत असलेल्या वसतीगृहातही पोलिसांनी तपास केला आहे.
इंटर्नशिप पूर्ण होण्यास केवळ दोन दिवस शिल्लक
गौरी नारायणन ही 12वीत असतानापासूनच मानसिक तणावाखाली होती. त्या संदर्भात ती डॉक्टरांकडे उपचारही घेत होती. तिचे आई-वडील डॉक्टर असून गौरीची छोटी बहीण 12वीत शिकत आहे. गौरीला गोव्यात डॉक्टर होण्यासाठी त्यांनी पाठविले होते. गौरीने गोमेकॉच्या वसतीगृहात राहून डॉक्टरेटचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ती इंटर्नशिप करीत होती. तिची इंटर्नशिप पूर्ण होण्यास केवळ दोन दिवस शिल्लक होते.
घटनास्थळाची कसून तपासणी
या गूढ मृत्यूमुळे पोलिसांकडून सखोल तपास सुरू झाला आहे. मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळी व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली. फॉरेन्सिकतज्ञ आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी समुद्रकिनारा आणि आसपासच्या परिसराची कसून तपासणी केली. वैद्यकीय साधने, वैयक्तिक वस्तू किंवा महत्त्वाचे धागेदोरे ठरू शकणाऱ्या इतर गोष्टींचाही शोध घेण्यात आला. तिच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम समजून घेण्याच्या उद्देशाने तपासकर्त्यांनी घटनास्थळाची पाहणी सुरू ठेवली.
तपासकर्ते मृत डॉक्टरची वैयक्तिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी तपासत आहेत, तसेच ती समुद्रकिनाऱ्यावर एकटी आली होती की दुसऱ्या कोणासोबत, याचाही शोध घेत आहेत. ती त्या ठिकाणी कशी पोहोचली आणि तिच्याशी संबंधित एखादे वाहन आसपासच्या परिसरात आढळले का, याचाही पोलिस तपास करत आहेत.
अफवा पसरवू नयेत : अधीक्षक डॉ. पाटील
गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे आणि फॉरेन्सिक तसेच वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. त्यांनी पुढे सांगितले की, मृतदेहाजवळ सापडलेली कोणतीही वस्तू तपासाचा भाग आहे आणि त्याबाबत कोणताही तर्क-वितर्क किंवा अफवा पसरवू नयेत. डॉ. पाटील यांनी हे देखील स्पष्ट केले की, भूल देणारी औषधे सहज उपलब्ध नसतात आणि इंटर्न डॉक्टरला ती मिळणे शक्य नव्हते. गौरीने तिची इंटर्नशिप पूर्ण केली होती आणि ती संस्था सोडण्याच्या तयारीत होती, यालाही त्यांनी दुजोरा दिला.