Miraj clash | घराला दुसरं कुलूप लावताना रंगेहात पकडलं अन्...; मिरजेतील 'त्या' वादाची Inside Story!
मिरजमध्ये घराच्या ताब्यावरून दोन गटांत तुंबळ दगडफेक;
मिरज : शहरातील नदीवेस, पवारगल्ली येथे घराचा ताबा घेण्याच्या वादातून दोन गटात दगडाने तुंबळ मारामारी झाली. याबाबत दोन्ही गटाच्या महिलांनी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिली असून, दोन्ही गटाकडील सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
एका महिलेच्या गटातील तक्रारीनुसार, ती व पती असे दोघेजण पवार गल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ थांबले असताना संशयीत जमाव करुन आले. त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी जमावाने महिलेसह पतीला दगडाने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. संबंधीत महिलेच्या तक्रारीवरुन संशयीत राणी नलवडे, दिपाली विजय मुळे, विजयमुळे व एक अनोळखी अशांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तर दुसऱ्या गटातील महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी घाणवट घेतलेल्या घराला संशयीत युवराज पवार व रुपाली पवार असे दोघेजण दुसरे कुलूप लावत होते. यावेळी महिलेने जाब विचारुन तुमचे घर मोकळे करते, असे समजावून सांगत असताना संशयीत युवराज व रुपाली यांनी शिवीगाळ केली. तुमचे पैसे दिले आहे, तुम्ही घर का सोडत नाही, असे म्हणून महिलेचा भाऊ विजय मुळे यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली.
तुम्ही आमचे घर मोकळे न केल्यास जीवत ठेवत नाही, अशी धमकी दिली. याबाबत दोन्ही गटाच्या महिलांनी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे.