Kagal : कागल परिसरात गव्यांचा धुमाकूळ; ऊसपिकाचे मोठे नुकसान !
कागलमध्ये पुन्हा गव्यांचा सुळसुळाट
कागल : कागल अनंत रोटो परिसराच्या पुढील भागातील शेतात बुधवारी पहाटेच्या सुमारास चार गवे दिसले. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून स्थानिक शेतकयांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्यांनी शेतातील ऊसाच्या लावणीचे मोठे नुकसान केले आहे.
संदीप माळी यांच्या बंगल्याजवळ पहाटेच्या दरम्यान कुत्री सतत भुंकू लागल्याने ते बाहेर आले. यावेळी चार गवे त्यांच्या नजरेस पडले. मात्र अंधार असल्याने त्यांना हे गवेच आहेत, हे ओळखता आले नाही. त्यांनी शेजारील शेतकयांना फोन करून तुमची जनावरे सुटून आलीत का? अशी विचारणा केली. त्या शेतकयांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता माळी यांनी सांगितलेल्या वर्णनावरून ते गवेच असल्याचा संशय व्यक्त केला. रात्रीच्या अंधारात त्यांच्या पायांवरील पांढऱ्या पट्ट्यांमुळे ते गवे असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान वीरकुमार पाटील हे माहिती मिळताच पहाटे आपल्या शेतात जाऊन आले. यावेळी त्यांनी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाल्याचे दिसून आले. गव्यांनी खापरे, चौगुले मळा परिसर, लक्षापतीच्या रानातून नदीकडे वाट धरल्याचे काही शेतकयांनी सांगितले. शेतात सुमारे एक किलोमीटरपर्यंत गव्यांच्या पायाचे ठसे स्पष्टपणे दिसून आले. गेल्या तीन वर्षांपासून या परिसरात दरवर्षी गवे दृष्टीस पडत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.