दुधातील वर्गवारी ए 1 की ए 2
अन्न सुरक्षितता व प्रमाण संस्था(FSSAI-Food Safety and Standards Authority of India) ही भारतीय खाद्य उद्योगात गुणवत्ता नियंत्रणाची महत्त्वाची भूमिका पार पाडते. अन्न प्रक्रिया उद्योगांना परवाने देणे, गुणवत्ता मानक निश्चित करणे व ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ही संस्था 2008 मध्ये स्थापन झाली असून ‘दूध’ वापर करणाऱ्यांसाठी व विक्रेत्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय अलीकडेच घेतला असून त्याचे स्वागत विविध स्तरातून केले जात आहे. ‘दूध हे आता A1 व A2 अशा वर्गवारीमध्ये विकता येणार नाही तसेच समाज माध्यमावरून तातडीने याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून येत्या 6 महिन्यात त्याची पूर्णत: अंमलबजावणी होणार आहे. हा निर्णय व त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी प्रथम दूध गुणवत्तेबाबत अन्न सुरक्षा व प्रमाण संस्थेचे निकष लक्षात घेणे व A1, A2 या दूध प्रकाराचे नेमके अर्थ व अन्वयार्थ समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
‘दूध’ हे आपल्या शहरात अनेक पद्धतीने वापरले जात असते व त्याबाबत प्रारंभीच्या टप्प्यात फॅट किंवा स्निग्धांश निकषानुसार 4.5 ते 8.5 टक्के एसएनएफ असणारे दूध प्रमाणित (Standard) मानले जाते. या व्यतिरिक्त दुग्ध उत्पादन, प्रक्रिया, साठवण, वाहतूक विक्री अशा विविध टप्प्यात गुणवत्ता निकष ठरवण्यात आले आहेत. नेहमीच्या वापरात 3.25 टक्के फॅटचे पूर्ण दूध, 2 टक्के फॅट व 1 टक्के फॅटचे व फॅट नसणारे असे चार प्रकारचे दूध असते. दूध गुणवत्तेचे तसेच दुग्धजन्य पदार्थाबाबत आयएसओ-67.100 चे निकष आहेत हे आंतरराष्ट्रीय मानांकन आहे.
A1 व A2 दूध प्रकार
नेहमीच्या सर्वसाधारण ग्राहकांना जे दूध प्रकार परिचित असतात. त्यामध्ये गाईचे, म्हैशीचे, शेळीचे किंवा फॅट काढलेले असे प्रकार समाविष्ट होतात. दुधामध्ये असणाऱ्या प्रथिनांची निर्मिती ज्या केसीनपासून होते. त्यावरून दुधाचे A1 व A2 असे प्रकार पडतात. न्युझीलंडचे शास्त्रज्ञ डॉ. कोरान मॅकचालन यांनी 1990 मध्ये काही गाईंच्या दुधात A1 व A2 प्रथिने असतात. तर काही गाई A1 प्रथिने नसणारी फक्त A2 असणारे दूध निर्माण करतात, असा महत्त्वाचा अभ्यास प्रसिद्ध केला. यातील A2 प्रकारचे दूध हे अधिक आरोग्यदायी असल्याचे काही अभ्यासातून स्पष्ट झाल्यानंतर 2000 मध्ये A2 दूध महामंडळ न्यूझीलंडमध्ये स्थापन झाले व तेथून A2 दुधाचे व्यापारी फायदे घेण्याचे पर्व सुरु झाले. आपल्या दुधात A1 प्रथिने नसतात कारण त्यातून हृदयविकार व लहान मुलांच्यात डायबेटीस, स्वमग्नता असे आजार होण्याची शक्यता असते अशी जाहिरात केली. परंतु A2 कंपनीच्या दुधामध्ये A1 घटक आढळल्याने त्यांना दूध गुणवत्ता चांगली असली तरी A1 घटक असतो हे मान्य करावे लागले.
A2 दुधाचे फायदे?
1990 च्या न्युझीलंडमधील शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून विविध आजारांचा A1 बीटाकेसीन प्रोटीन घटकाशी सहसंबंध असल्याचे स्पष्ट झाले. यातून पुढे विविध शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास सुरु केला असून बीसीएम 7 हे पचन प्रक्रियेत बिघाड करणारे असून त्यातून प्रतिकारशक्ती कमी करणारे, हृदयरोग, मेंदूरोग होण्याची संभाव्यता वाढते, असा निष्कर्ष मिळाला. ही बाब सार्वजनिक आरोग्याबाबत जशी महत्त्वाची होती तसेच एक मोठी व्यापारी संधी होती. विविध प्रदेशातील गाईंच्या दुधामध्ये A1, A2 बीटाकेसीन यात फरक होता. आशिया व आफ्रिका खंडातील गाई फक्त A2 प्रकारचे तर युरोपमधील गाई A1 बीटाकेसीन असणारे दूध देतात. A2 दुधाची विक्री करण्यासाठी न्यूझीलंड येथे A2 कॉर्पोरेशन नावाची संस्था स्थापन करण्यात आली व A2 चे पेटंट घेण्यात आले. पारंपरिक दूध हे आरोग्यास हानीकारक असते. A1 दुधाने डायबेटीस स्वमग्नता, स्क्रीझोफेनिया असे आजार होतात अशी जाहिरात केली. यातून पारंपरिक (A1) दूध विकणाऱ्या फाँटेश कंपनीने कायदेशीर कारवाई सुरू केली. यातून न्युझीलंडची दूध निर्यात व अर्थव्यवस्थाच अडचणीत आली. तथापि आरोग्य विषयक सर्व दावे सिद्ध न करता आल्याने A2 कंपनीस 15 हजार डॉलर्सचा दंड भरावा लागला! केथ वुडफोर्ड यांनी तर अन्ग्त् ग्ह tप श्ग्त्क् ‘दुधातील सैतान’ असे A1 घटकाचे वर्णन करीत पुस्तकच लिहिले. A2 चा प्रसार ऑस्ट्रेलियात झपाट्याने झाला. 2010 पर्यंत 40 द. ल. लिटर A2 दुधाची बाजारपेठ बनली. अमेरिका, इंग्लंड, चीन, ब्राझील अशा देशात A2 चा प्रसार झाला.
A2 आरोग्यवर्धक?
A1 प्रकारच्या दुधातील प्रथिनात हिस्टीडाईन नावाचे घातक अमिनो आम्ल असते व असे दूध प्यायल्यानंतर पचन होताना त्यातून हिस्टीडाईन विभक्त होऊन बीटा कासो मॉरफीन-7 (बीसीएम-7) हे घातक रसायन तयार होऊन स्वादुपींडावर त्याचा परिणाम होतो. इन्शुलीन निर्मिती यामुळे होत नाही व डायबेटीस होतो. यातून पुढे हार्टअटॅक, कॅन्सर, किडनीचे रोग असे 80 रोग उदभवतात. हे सर्व टाळण्यासाठी A2 हे आरोग्यवर्धक दूधच घ्यावे असा अग्रही प्रचार केला जाऊ लागला. भारतातही जर्सी गाई व इतर विदेशी गाईंचे दूध घेतल्याने आजार वाढले असून देशी गाईचेच दूध, तूप, दही घेण्याचा आग्रह केला जातो. आरोग्याविषयी अधिक जागरुक व श्रीमंत मंडळी आपण फक्त गीर गाईचेच दूध घेतो हे आग्रहाने व अभिमानाने सांगतात!
हा तर बाजारखेळ!
A1 दूध घातक असते व A2 हेच आरोग्यसंपन्न, फायदेशीर असते असे प्रचारकी व अपूर्ण संशोधन आधारीत निष्कर्ष वापरत दुधाचा बाजारखेळ हा दूधखुळे निर्माण करणारा ठरला. तथापि शास्त्रीय प्रयोग, सातत्यपूर्ण प्रयोग करीत सत्य तपासणाऱ्या विविध संशोधनातून A1 दुधाच्या सेवनाने हानीकारक परिणाम होतात, असा कोणताही पुरावा मिळाला नाही. A2 च्या समर्थनार्थ केलेले अभ्यास सहसंबंध दर्शवत असले तरी त्यातून ‘कारण-परिणाम’ सिद्ध झाले नाही. मात्र A2 हे उत्तम प्रतीचे दूध असल्याने त्यापासून तयार होणारे दही, पनीर, योगर्ट इ. उच्च प्रतीचे असते असा दावा करीत त्याची विक्री अधिक दराने भारतातही केली जाते. यावर अनेक ग्राहक मंचाने व दुग्ध उत्पादक (A1) यांनी सातत्याने तक्रार केल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा व मानक (FSSAI) ने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आणि सत्य स्वीकारले. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित अन्नपदार्थ हा ग्राहकांचा हक्क या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले म्हणावे लागेल. त्यादृष्टीने खूप वाटचाल करावी लागणार आहे. अद्यापि बनावट दुधाची, भेसळयुक्त दुग्ध पदार्थांची बाजारपेठ मोठी असून 2020 मध्ये केलेल्या पाहणीतून 69 टक्के दूध हे दर्जेदार नव्हते, असा निष्कर्ष मिळाला आहे. त्यातही 85 टक्के हे ब्रँडेड दूध दर्जा सोडून होते! दुधाने आरोग्य संपन्न होते हा समज आहे परंतु दुधाचे आरोग्य बिघडले आहे हे सत्य आहे! बाजारप्रभाव: A2 दुधाबाबतचा आदेश जेवढ्या तातडीने काढला तेवढ्याच तातडीने तो आठवड्याच्या आत माघारी घेतला. याबाबत भारतीय कृषी संशोधन (ICAR) चे सदस्य बदरवाड यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून विनंती केल्यानंतर A2 बाबतचा आदेश रद्द केला असून ग्राहकास पुन:श्च निवड स्वातंत्र्य दिले आहे!
- प्रा. विजय ककडे