चोऱ्यांचा छडा लावा अन्यथा रास्ता रोको करू
उबाठा सेनेचा आचरा पोलिसांना इशारा, 15 दिवसाची दिली मुदत
कारवाई बाबत विचारला जाब, आचरा पोलिसांना दिले निवेदन
आचरा प्रतिनिधी
गेल्या वर्षभरात आचरा पोलिस कार्यक्षेत्रात सातत्याने भर दिवसा चोऱ्यांचे प्रकार घडत असून कोणत्याही चोरीचा छडा लागलेला नाही. चोरटे मोकाट असून आचरा कार्यक्षेत्रातील लोकांची प्रचंड नाराजी आहेत भंगारवाले, फेरीवाले यांचा सुळसुळाट झाला आहे. आचरा पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसून येत्या 15 दिवसात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावा अन्यथा आचरा तिठ्यावर रास्तारोको करून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आचरा पोलिसांना निवेदन देत दिला आहे.
यावेळी आचरा पोलीस ठाण्याचे चार्ज पोलीस निरीक्षक पोवार निवेदन देण्यात आले यावेळी आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर, विभागप्रमुख समीर लब्दे, पळसंब उपसरपंच अविराज परब, चिंदर ग्रामपंचायत सदस्य केदार परूळेकर, वायंगणी ग्रामपंचायत सदस्य सचिन रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर,आचरा ग्रामपंचायत सदस्या पूर्वा तारी, सदा राणे, संतोष गोरवले, माणिक राणे, अर्चन पांगे, संजय वायंगणकर, जगदीश पांगे, प्रकाश वरडकर, सचिन परब, रामदास प्रभू, नबीला काझी, शेखर सारंग, सदानंद घाडी, सुंदर आचरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
आचरा पोलिसांची गस्त वाढवावी
वायंगणी येथील वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सुमारे 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरटयांनी दुचाकीवरून येत लंपास केले होते. अशाच प्रकारच्या घटना आचरा भागात वर्षभरात घडून एकही चोरीचा तपास न लागल्याने उबाठा सैनिक आचरा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. आचरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेले वर्षभर दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहेत. आता पर्यंत पोलिसांनी काय तपास केला नाही. या भागात बाजारपेठा, बँका शिक्षण संस्था आहेत . या भागात दिवसा रात्री आचरा पोलीसांची गस्त चालू असायची. मात्र अलीकडच्या काळात पोलीस गस्त घालताना दिसत नाहीत कोणीही अज्ञात व्यक्ती राजरोस फिरत आहेत याला आळा घालायचा असेल तर आचरा पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी टेमकर यांनी केली
फेरीवाले, भांगारवाले यांच्यावर कारवाई कधी होणार
आचरा गावात मोठया प्रमाणात भंगारवाले ,फेरीवाले ,परप्रांतीय दाखल होऊन वास्तव्य करून आहेत. दिवसाढवळ्या ते प्रत्येक वाडीत फिरत आहेत . त्यांच्याकडे विना नंबर प्लेट जुन्या गाड्या आहेत. हेच फेरीवाले चोरी झाली की गायब होतात अशा फेरीवाल्यांवर कारवाई कधीच होत नाही तसेच भंगारगोळा करणाऱ्या प्रत्येक इसमाकडे आधारकार्ड सारखा ओळखीचा पुरावा आहे की नाही हे तपासण्याची मागणी यावेळी लब्दे यांनी केली. आचरा पारवाडी ब्रिज तसेच आचरा भागातील मुख्य रस्त्यावर सिसिटीव्ही अजूनही लावण्यात आले नसून मुख्य प्रवेश मार्गावर सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी यावेळी टेमकर यांनी केली.
संख्याबळ कमी तर पोलीस पाटीलांना कार्यरत करा,
मनुष्यबळ कमी आहे असे वारंवार पोलिसांकडून सांगितले जाते. शासनाने महसूली गावानुसार पोलीस पाटील भरती केली आहे . गावात पूर्वी एक किंवा दोन पोलीस पाटील होते. आज गावात बारा पोलीस पाटील कार्यरत आहेत. आपल्याकडे मनुष्य बळ कमी असेल तर या पोलीस पाटीलांना कार्यरत करावे . गावात बाहेरून येऊन वास्तव्य करत असलेल्या लोकांची माहिती गोळा करायला लावा, फेरी वाल्याना अटकाव करून त्याची माहिती पोलीस खात्याला द्यायला लावा जेणेकरून होत असलेल्या चोऱ्यांना लगाम बसेल अशी मागणी यावेळी प्रकाश वराडकर यांनी केली. आचरा व पंचक्रोशीत गांजा आणि चरस विक्रीचे प्रमाण वाढले असून तरुण पिढी याच्या आहारी जात आहे तेव्हा गांजा विक्री करण्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर यांनी केली आचरा व पंचक्रोशीतील झालेल्या चोऱ्यांचा तपास चालू आहे. ज्या व्यक्तीने संशयित शक्य तितके अंदाज पडताळून पाहिले जात आहेत, मिळालेल्या माहितीनुसार स्केच बनवली असून प्रत्येक जिल्ह्यात त्याबाबत कळवण्यात आले असून त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. सीसीटीव्ही फुटेज घेतली जात आहेत तपास कोठेही थांबलेला नाही पोलीस चोरांच्या मागावर आहेत. लवकरच चोऱ्यांचा छडा लावण्यात यशस्वी होतील असा विश्वास आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोवार यांनी व्यक्त केला.
फोटो : परेश सावंत