For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुबईतील प्रलयंकारी पर्जन्यवृष्टी

06:30 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुबईतील प्रलयंकारी पर्जन्यवृष्टी
Advertisement

हल्लीच दुबईत कोसळलेला मुसळधार पाऊस हा जगभर चर्चेचा अणि चिंतेचा विषय ठरलेला आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने दुबईत केलेली असंख्य विकासाची कामे आणि त्यासाठी निर्माण केलेल्या पायाभूत साधनसुविधा या सर्वांसाठी आकर्षण बिंदू ठरलेल्या होत्या. दुबई प्रलयंकारी पावसाच्या माऱ्यात कशी काय डुबली याबाबतचे विवेचन या लेखात.

Advertisement

इथले झपाट्याने झालेले नागरीकरण आणि उभारण्यात आलेल्या गगनचुंबी इमारती, रस्त्याचे जाळे आणि विजेचा लखलखाट या साऱ्या बाबी पाहण्यासाठी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे दुबईत सुट्टी घालवण्यास जायचे आणि तेथील केलेली प्रगती पाहून भारावून जायचे. ही लोकविलक्षण प्रगतीची घेतलेली भरारी दुबईनं निसर्ग, पर्यावरण, हवामानाबद्दल आणि जागतिक तापमान वाढ यांच्याकडे गांभिर्याने लक्ष न देता केल्याने त्याची किंमत किती जबरदस्त असू शकते, याची जाण केवळ दुबईलाच नव्हे तर अरब स्थानातील समस्त राष्ट्रांना आलेली आहे. अद्यावत साधनसुविधा निर्माण करताना, कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जमिनीत योग्यरितीने निचरा झाला नाही, येणाऱ्या वादळवाऱ्यांना सामोरे जाण्यासाठी नियोजनबद्ध आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कार्यरत नसेल तर त्याचे दुष्परिणाम किती भयानक आणि दूरगामी असू शकतात, याची जाणीव निर्माण झालेली आहे. वास्तवाचे भान ठेवून विकसाच्या योजना राबविणे गरजेचे असल्याची बाब प्रकर्षाने येथे अधोरेखित झालेली आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या अरबी वाळवंटात वसलेल्या दुबईत दीड वर्षात जितका पाऊस कोसळतो, तो चक्क एका दिवसात कोसळला आणि महानगराची त्यामुळे कशी दाणादाण उडू शकते, याची प्रचिती तिथल्या प्रशासनाला आली. गेल्या पाऊण शतकात, इतकी पर्जन्यवृष्टी कधी दुबईत झाली नव्हती. हा पाऊस आकस्मिकपणे इतका कोसळला की, त्याला सामोरे जाताना दुबईतल्या नागरिकांची दाणादाण उडाली. संयुक्त अरब अमिरातीत कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यासाठी ढगात केलेले बिजारोपण त्याचप्रमाणे हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीचे मुद्दे हवामान शास्त्रज्ञांच्या मते या प्रलयंकारी पर्जन्यवृष्टीला कारण ठरलेले आहे. हा पाऊस कोसळण्यापूर्वी पर्शियश आखातात तिथल्या पाण्यापासून वादळ तयार झाले होते आणि त्याला जागतिक तापमान वाढीने आणखी बळ प्राप्त झाले. संयुक्त अरब अमिरातीत वार्षिक सरासरी 200 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस कोसळत असतो आणि दुसऱ्या बाजूला उन्हाळ्यात इथले तापमान 50 अंश सेल्सियसपर्यंत जाते आणि त्यामुळे जलसंकट निर्माण होत असते. भूगर्भात असलेल्या जलस्रोतांचा वारेमाप उपसा होऊन ही जलसंकटाची तीव्रता कमी होत नसते. त्यासाठी निवडक ढगांत कृत्रिमरित्या बिजारोपण करून पाऊस पाडण्याकडे कल झुकलेला आहे.

Advertisement

विमाने ढगात पाठवून मिठांच्या अंशाची तेथे पेरणी केली जाते. ढगात फवारलेले मिठाचे कण पसरून, त्यातले बाष्प शोषून घेतल्याने पाण्याचे थेंब एकत्रित येतात आणि अशा ढगातून कृत्रिमरित्या पर्जन्यवृष्टी होत असते. कृत्रिमरित्या निवडक ढगात बिजारोपण करून पाऊस पाडण्याच्या या प्रक्रियेनं जलसंकटावर काही प्रमाणात मात करणे शक्य झालेले असले तरी त्याचे पर्यावरणावरती गंभीर दुष्परिणाम होतात, याच्याकडे बरीच राष्ट्रे कानाडोळा करीत आहेत. पर्यावरणीय समस्यांबरोबर संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे, त्याचप्रमाणे सिल्व्हर आयोडाईड हे रसायन महासागरातील परिसंस्थेवर ओझोन वायुच्या थरावर आणि वातावरणातील कर्ब वायूवर परिणाम करतात. त्याचप्रमाणे सिल्व्हर आयोडाईडचे वनस्पती सृष्टीबरोबर सजीव प्राणीमात्रांवरती परिणाम होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. जेव्हा प्रलयंकारी पाऊस दुबईत कोसळला, त्यादिवशी तिथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर 142 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळून, परिस्थिती हाताबाहेर गेली.

ढगात पावसासाठी बिजारोपण करण्याचा जगातला पहिला यशस्वी प्रयोग हवामानशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ अमेरिकन व्हिन्सेंट जे शेफर यांनी केला आणि जेथे पर्जन्यवृष्टी दुरापास्त होऊन, जलसंकट तीव्र झालेल्या राष्ट्रांना त्यामुळे दिलासा प्राप्त झाला. 1946 साली करण्यात आलेला कृत्रिम पर्जन्यवृष्टीचा हा प्रयोग संयुक्त अरब अमिरातसारख्या राष्ट्रांनी अंगिकारला. 1982 साली त्यांनी कृत्रिमरित्या ढगात बिजारोपणाची चाचपणी केली आणि 2000 पासून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेला चालना दिली. या प्रक्रियेत मिठाचे अंश केंद्रक म्हणून काम करतात आणि पाण्याचे थेंब घनरुप धारण करतात. कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याची ही प्रक्रिया संयुक्त अरब अमिरातीत चालू आहे. रासायनिक मिठाऐवजी त्यांनी नैसर्गिक मिठाचा वापर आरंभलेला आहे. दुबईने विकासात भरारी घेतलेली असली तरी तेथील धुळीचे साम्राज्य नियंत्रित झालेले नाही. यावेळी दुबईत जो प्रलयंकारी पाऊस कोसळला, त्यात तेथील धुळीच्या कणांनी संक्षेपण केंद्रक म्हणून काम केले असावे. तेथील महासागरात जे बाष्पीभवन होते आणि पाण्याची वाफ अधिक उंचीवर जाऊन पाण्याच्या थेंबात किंवा बर्फाच्या स्फटिकांत रुपांतरीत होतात, हे पाण्याचे थेंब किंवा बर्फाचे स्फटिक एकत्रित येऊन ढग तयार होतात. पाण्याची वाफ थंड होते आणि वातावरणात तरंगणाऱ्या धुळीच्या कणांभोवती किंवा क्षाराभोवती घनरुप निर्माण होते. कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेतून आणि हवामान बदलामुळे दुबईत प्रलयंकारी पाऊस कोसळून तेथील लोकांची दाणादाण उडालेली आहे.

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आज मानवी समाजाने विविध क्षेत्रांत जी उत्तुंग भरारी घेतलेली आहे, ती खरंतर डोळे दीपवून टाकणारी अशीच प्रगती आहे. देशविदेशातल्या पर्यटकांसाठी दुबईची ही प्रगती केवळ चर्चेचाच नव्हे तर प्रेरणेचा विषय ठरला होता परंतु निसर्ग आणि पर्यावरणीय मूल्यांकडे दुर्लक्ष करून, आपण जेव्हा विकासाची प्रक्रिया राबवितो, पायाभूत साधनसुविधा निर्माण करतो, तेव्हा खरंतर आम्ही वास्तवाकडे पाठ फिरवून मृगजळामागे धावण्यात धन्यता मानत असतो. ही विकासाची प्रक्रिया, कालांतराने आपल्या अस्तित्वासाठी मारक ठरते आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगताना आपली अक्षरश: त्रेधातिरपिट उडते. आपल्या देशातल्या चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, मुंबईसारख्या महानगरात प्रलयंकारी कोसळलेल्या पावसाने तेथील नागरिक आणि प्रशासनाची वेळोवेळी भंबेरी उडवलेली आहे. विकासाचे प्रकल्प आपण जेव्हा हाती घेतो, तेव्हा येथील मान्सूनचा पाऊस, वादळवारे आणि अन्य नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी कोणते नियोजन करण्यात आलेले आहे? कोणत्या स्वरुपाचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आणि पूर्वतयारी केलेली आहे, या बाबी महत्त्वाच्या आहेत. दुबईतल्या प्रलयंकारी पावसाला मानवनिर्मित परिस्थिती जशी जबाबदार आहे तसेच तेथील आर्द्रता, वाढलेले तापमान त्याचप्रमाणे आखातात निर्माण झालेले वादळ आदी नैसर्गिक कारणे जबाबदार ठरलेली आहेत, हे दुर्लक्ष करता येणार नाही.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.