कोल्हापुरात रंगला कॅट शो
कोल्हापूर
घरा-घरामध्ये फिरून चोरून दूध पिणाऱ्या मांजरांची क्रेझ आता बदलली आहे. श्वानासह मांजर ही आता घरातील एक सदस्य झाली आहे. आज अनेक घरांमध्ये देशी-विदेशी मांजर पाळणे आता शौक झाला आहे. कोल्हापुरात अशा मांजरांचा रविवारी महासैनिक दरबार हॉलमध्ये, फिलाईन क्लब ऑफ इंडियाच्यावतीने, 74 व 75 वा चाँम्पियनशिप कॅट शो पार पडला. या शोमध्ये देशासह व परदेशातील सुमारे 250 मांजरांचा समावेश होता. कॅट शो पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
कोल्हापुरात विविध जातीच्या श्वानासह मांजर पाळण्याचा शौक वाढत आहे. त्यांच्या खाण्यासह पाळणेसुध्दा महागडे ठरले आहे. असे श्वान, मांजर घरातील सदस्य झाले आहेत. डॉग शो बरोबर, या मांजरांचा कॅट शो रविवारी झाला. यामध्ये पर्शियन, आकाराने सर्वात मोठा व ज्याची किंमत दीड लाखांपेक्षा जास्त आहे अशा अमेरिकन मेन कून, एक्झाटिक शॉर्टं हेअर, रशियन सायबेरियन, वाघासारखे पट्टे असणारे बेंगल, थायलंडचे सियामिज, क्लासिक लाँग हेअर, क्लासिक शार्ट हेअर आदी जातीच्या 250 मांजरांचा समावेश होता.
दिवसभरात कॅट शोसह स्पेशालिस्ट शो सुरू होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून, फॅडली फुआद (इंडोनेशिया), इंद्रा लुईस (इंडोनेशिया) व साकिब पठाण (भारत) यांनी काम पाहिले. तर कोल्हापूर क्लबच्या सदस्यांनी याचे आयोजन केले होते.