वळीवडेच्या ग्रामपंचायत सदस्याचा दाखला जात पडताळणी समितीने ठरवला अवैध! दाखला रद्द होण्याची शक्यता
उचगाव/ वार्ताहर
वळीवडे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत दिगंबरे यांचा ओबीसी दाखला जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविला, अशी माहिती माजी उपसरपंच प्रकाश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयानुसार दिगंबरे यांचा जातीचा दाखला तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणीही करवीरच्या प्रांताधिकार्यांकडे केली असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिंदे म्हणाले की वळीवडे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत दिगंबरे यांनी प्रभाग क्रमांक सहामधून जैन पंचम म्हणजे इतर मागास प्रवर्गातून निवडणूक लढवली. पण त्यांच्या दाखल्याबाबत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आपण तक्रार केली. त्यानुसार दाखला काढण्यासाठी दिगंबरे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची समितीने पडताळणी केली. वळीवडे कुमार विद्यामंदिरच्या दाखल्यामध्ये व करवीर तहसीलदारांच्या गावनमुना उताऱ्यामध्ये खाडाखोड आढळून आली. दिगंबरे यांचे वडील, चुलते, नातेवाईकांचे दाखले जैन चतुर्थ आहेत. म्हणून दिगंबरे यांनी पंचम जैन दाखला मिळवण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची पोलीस दक्षता पथकाने तपासणी केली. या पथकाच्या अहवालाअंती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने विश्वजीत दिगंबरे यांचा हा दाखला अवैध ठरविला व करवीरच्या प्रांताधिकार्यांनी तो जप्त करावा, असे या समितीने कळवले आहे.