निवडणुकीपर्यंत कॅसिनोंनी ‘भिवपाची गरज ना’!
मुख्यमंत्री डॉ. सावंत मंत्रीमंडळाचा निर्णय : मार्च 2027 पर्यंत तरंगत राहणार कॉसिनो
पणजी : सरकारी राजाश्रयाने मांडवी नदीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कॅसिनोंना आता आणखी सुमारे अडीज वर्षाची मुदतवाढ दिली आहे. याच वर्षी विधानसभा निवडणुकही होणार आहे. अशावेळी हा कालावधी पाहता निवडणुकीपर्यंत कॅसनोंना ‘भिवपाची गरज ना’ यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बुधवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कॅसिनोंना मुदतवाढ देण्याचा हा शेवटचा निर्णय असल्याचे ठरविण्यात आले आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेस वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांचीही उपस्थिती होती.
दोन दशकांपासून तंरगतात कॉसिनो
मांडवी नदीत सहा तरंगते कॅसिनो कार्यरत आहेत. गेल्या सुमारे दोन दशकांपासून मांडवीत व्यवसाय करणाऱ्या या कॅसिनोंना आतापर्यंत किमान 23 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थापनेपासूनच या कॅसिनोंना जोरदार विरोध होत होता. त्यांचे मांडवीतून स्थलांतर करण्यात यावे, अशी विविध संघटना, पर्यावरणप्रेमी आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोरदार मागणी होत होती.
शंभर दिवसांत कॅसिनो बाहेर काढू
एवढेच नव्हे तर तत्कालीन सरकारच्या राजकीय विरोधकांनी चक्क ‘मशाली’ पेटवून थेट कॅसिनोंवर चाल केली होती. या सर्वांवर कडी केली ती गत निवडणुकीत पणजीच्या उमेदवाराने. आपण विजयी झाल्यास ‘100 दिवसांच्या आत’ सर्व कॅसिनो मांडवीतून बाहेर काढू असे दणकेबाज आश्वासन देत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला व त्यात यशस्वीही झाले. तरीही मांडवीच्या तळाशी घट्ट ऊतलेले कॅसिनोंचे नांगर काही हलले नाहीत व आजतागायत ते हटविणे कुणाला शक्य झालेले नाही. दर विधानसभा निवडणूक काळात कॅसिनोंचा विषय चर्चेला येतो. परंतु, या कॅसिनोंना दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट असून या कॅसिनोंच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यावधींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा होत असल्यामुळे या कॅसिनोंना मुदतवाढ देण्यात येत आहे.
तब्बल दोन वर्षे तीन महिन्यांची मुदतवाढ
अशाप्रकारे या कॅसिनोंना विरोध होत असल्याने प्रारंभीच्या काही वर्षात सरकारकडून दबक्या आवाजात त्यांना केवळ सहा महिन्यांसाठीच मुदतवाढ देण्यात येत होती. पण काही काळानंतर लोकांचा रोष ओसरल्याची संधी घेत त्यानंतरच्या सरकारांनी या कॅसिनोंना वर्षभराची मुदतवाढ देण्यास सुरूवात केली. आता त्याही पलिकडे जाताना या मुदतीत सव्वा वर्ष, दीड वर्ष अशी चढत्या क्रमाने वाढ देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी देण्यात आलेली मुदतवाढ तर सर्वांना भारी ठरली आहे. मार्च 2027 पर्यंत म्हणजे तब्बल दोन वर्षे तीन महिन्यांसाठी आहे. याचाच अर्थ येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे कॅसिनो मांडवीत निर्भिडतेने तरगंत राहतील हे नक्की झाले आहे. प्रत्यक्षात या कॅसिनोंचे शहरापासून दूर अरबी समुद्रात स्थलांतर करण्याच्या उद्देशाने यापूर्वी चार ठिकाणांची निवड करण्यात आली होती. परंतु सरकारकडून वेळोवेळी मुदत वाढवून घेण्यात यशस्वी ठरत असल्याने वर्षांनुवर्षे ते मांडवीतच ठाण मांडून आहेत.
विधानसभा अधिवेशन 6 फेब्रुवारीपासून
राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. 6 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नवीन वर्षातील पहिले अधिवेशन असल्याने राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशन प्रारंभ होईल. या अधिवेशनाचा कालावधी किती असावा यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.