पर्वरी गोळीबारप्रकरणातील संशयित सतीश शिंदे यांचे अटकेला आव्हान; आज उच्च न्यायालयात सुनावणी
पणजी : पर्वरी येथील निओ मेजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित सतीश शिंदे यांनी आपल्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पोलिसांनी आपल्याला कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता अटक केल्याचा दावा शिंदे यांनी याचिकेत केला आहे.
पर्वरी येथे २८ ऑगस्ट रोजी रात्री गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडून सुरू असून, तपासादरम्यान शिंदे यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हणत त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
शिंदे यांच्या याचिकेवर आज, मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान त्यांच्या अटकेची प्रक्रिया, पोलिसांनी केलेली कारवाई आणि संबंधित कायदेशीर बाबींवर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे यांच्या अटकेबाबतची पुढील कायदेशीर स्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये दोन कथित शूटरचा समावेश असल्याची माहिती आहे. २८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.४७ वाजता झालेल्या गोळीबारामुळे पर्वरी परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना संशयिताच्या अटकेला देण्यात आलेले आव्हान आणि त्यावर न्यायालय काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.