For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांडवीतील ‘कॅसिनो’ त्वरित हटवावे

12:59 PM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
मांडवीतील ‘कॅसिनो’ त्वरित हटवावे
Advertisement

‘पणजीकार अगेन्स्ट कॅसिनो’चे महापौर, आयुक्तांना निवेदन

Advertisement

पणजी : पणजी शहराचे ऊप बिघडत चालले आहे. याला सर्वस्वी मांडवी नदीतील कॅसिनो जबाबदार आहेत. तरीही सरकारला पणजी शहर, मांडवी नदीचे काहीच सोयर-सुतक पडलेले नाही. या कॅसिनोंचा त्रास खुद्द पणजीवासियांनाच होतोय असे नाही, संपूर्ण राज्यासाठी तो मोठा धोका बनला आहे. मांडवी नदीतील पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. मांडवी नदीतील प्रदूषण आणि पणजीतील स्थानिकांना होणारा त्रास सरकारने लक्षात घ्यावा आणि कॅसिनो मांडवीतून हटवावेत, अशी जोरदार मागणी ‘पणजीकार अगेन्स्ट कॅसिनो’ या संघटनेने केली आहे. महापौर रोहित मोन्सेरात व आयुक्तांची भेट घेऊन संघटनेच्यावतीने सोमवारी निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये वाल्मिकी नाईक, जॅक सुखीजा, पॅट्रिशिया पिंटो व इतर सदस्य उपस्थित होते.

निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, मांडवी नदीत कॅसिनो वाढतच आहेत. याला आळा घालण्यासाठी महापालिकेने बैठकीत ठराव घ्यावा, असे सूचविण्यात आले आहे. सरकार एका बाजूला म्हादई नदीचे संरक्षण करीत असल्याचे सांगते तर दुसऱ्या बाजूला मांडवी नदीचे प्रदूषण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. सरकारच्या आशीर्वादानेच कॅसिनो जम बसवून आहेत. त्यासाठी हे पूर्णपणे बंद व्हावे, यासाठी हे निवेदन दिले असल्याचे सांगितले. मांडवीतील कॅसिनोंमुळे त्याचा जनजीवनावर विपरित परिणाम होत आहे. नदीचे प्रदूषण वाढले आहे. ऐतिहासिक पणजी शहराची मूळ ओळख पुसली जात आहे. त्यामुळे हे कॅसिनो हटविणेच योग्य ठरणार आहे. पणजीकरांना अनेक वर्षांपासून कॅसिनोंच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे, असे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

Advertisement

महापालिकेला केवळ व्यापारी परवान्याचा अधिकार : महापौर

‘पणजीकार अगेन्स्ट कॅसिनो’ या संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिल्यानंतर महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. कॅसिनोला परवाना देण्याबाबतचा अधिकार कॅप्टन ऑफ पोर्टस्, नदी परिवहन विभाग व गृह विभागाला आहे. कॅसिनोला परवाना देण्याचा अधिकार महापालिकेला नाही. पालिकेकडून केवळ व्यापारी परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेची यामध्ये कोणतीही थेट भूमिका नाही. तरीही या विषयावर येत्या 12 फेब्रुवारी रोजी महापालिकेत बैठक बोलवली जाईल, असे आश्वासन महापौर मोन्सेरात यांनी शिष्टमंडळाला दिले.

Advertisement
Tags :

.