यंदा काजूच्या उतार्यात होणार घट
अवकाळी पाऊस, हवामानातील बदलामुळे उत्पादन कमी : बागायतदार शेतकरी अडचणीत
वार्ताहर/किणये
अवकाळी पाऊस, धुके व हवामानातील बदलामुळे काजूच्या झाडांना आलेला मोहोर खराब झाला आहे. त्यामुळे यंदा काजूच्या उताऱ्यात घट होणार आहे. शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारी काजुबाग आहे. मात्र वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि हवामानातील बदलामुळे काजू उत्पादनात घट झाली आहे. यामुळे बागायतदार शेतकरी अडचणीत आला आहे. बागायतदार शेतकऱ्यांना काळानुरूप अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. तसेच हवामानातही कमालीचा बदल झाला. यामुळे काजूचा मोहोर खराब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अडीच ते तीन महिने काजू हंगाम जोमाने सुरू असतो. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत बेळगाव जिह्यात काजू उत्पादनात वाढ झालेली आहे. यंदा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून काजूच्या झाडांना मोहोर फुलण्यास सुरुवात झाली. तर सध्या काजू फळधारणेचा मुख्य हंगाम आहे. हवामानातील वारंवार बदलामुळे व अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली असल्याची माहिती काजू उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यातील बहुतांश भागात काजूचे उत्पादन घेण्यात येते. काजूच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. काजू गोळा करून त्याची विक्री करण्यात येते. तसेच काजूच्या मुरट्याला मागणी वाढत असल्यामुळे स्थानिक टेम्पोमालक थेट बागांमधून मुरठ्यांची उचल करत आहेत.
बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, संतिबस्तवाड, वाघवडे, नावगे, बिजगर्णी, बेळवट्टी, कावळेवाडी, बोकनुर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, इनाम बडस, बाकनुर, बाची, बामणवाडी, बाळगमट्टी या भागात सर्वाधिक काजूचे उत्पादन घेण्यात येते. काजूच्या रोपट्याच्या लागवडीनंतर झाडांची तीन वर्षे देखभाल करावी लागते. त्यानंतर मात्र निसर्ग नियमाप्रमाणे वाढ होत जाते. यामुळे या बागायतीसाठी अल्प प्रमाणात खर्च येतो. शेतातील बांधावर खास बागायती करून काजू बागा तयार करण्यात येत आहेत. रोप लागवडीनंतर प्रारंभी त्याला खतपाणी देऊन त्याची देखभाल करण्यात येते.
तरुणांनी काजू प्रक्रिया व्यवसायाकडे वळावे
पश्चिम भागात काजूच्या बागायती अधिक प्रमाणात आहेत. इथल्या काजूला मागणीही अधिक आहे. काजूच्या गराला दर अधिक मिळतो. यासाठी या भागातही काजूवर प्रक्रिया करणारे युनिट अधिक तयार झाले पाहिजेत. यामुळे स्थानिक तरुणांना स्वत:चा उद्योग उपलब्ध होणार आहे. काजूच्या युनिटमुळे महिलांनाही रोजगार मिळू शकतो. त्यामुळे या भागातील तरुणांनी काजूवर प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायाकडे लक्ष देण्याची गरज आहे.