For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काजू उत्पादनात घट होण्याची शक्यता

10:37 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
काजू उत्पादनात घट होण्याची शक्यता
Advertisement

वातावरणाचा परिणाम : उत्पादक आर्थिक संकटात, हमीभाव जाहीर करण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /जांबोटी

यावर्षी वातावरणात झालेल्या बदलाचा प्रतिकूल परिणाम काजू पिकाच्या फळ धारणेवर झाला असून काजू मोहर करपून गेल्यामुळे काजू उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता असल्यामुळे काजू उत्पादक हवालदिल बनले आहेत. बेळगाव-खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात काजू उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे या भागात ओसाड माळरानावरील जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू लागवड करण्यात आली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यापासून काजू झाडे मोहराने बहरली होती. काजू बियांच्या फळधारणेसाठी पोषक वातावरण असल्यामुळे जानेवारी महिन्यातच काजूच्या फळधारणेला प्रारंभ झाला होता. काजू लागवड देखील समाधानकारक होती शिवाय काजू उत्पादनासाठी यावर्षी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे एरवी मार्च-एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या काजू उत्पादनाच्या हंगामाला फेब्रुवारी महिन्यातच प्रारंभ झाल्यामुळे यावर्षी जादा उत्पादन मिळणार असल्यामुळे काजू उत्पादकांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण तसेच रात्रीच्यावेळी पडणारे धुक्के दव तसेच कधी तीव्र उष्म्यामुळें बदलत्या नैसर्गिक बदलाचा प्रतिकूल परिणाम काजू उत्पादनावर झाला असून काजू मोहर पूर्णपणे करपून गेल्यामुळे मार्च महिन्यात ऐन बहरात असलेले काजू उत्पदनात एप्रिल महिन्यापासून मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. पहिल्या फळधारणेनंतर प्रतिकूल वातावरणामुळे काजू बियांची लागवड झाली नसल्याने आतापासूनच काजू उत्पादनात घट होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. एरवी मे, जून महिन्यापर्यंत चालणारा काजू उत्पादनाचा हंगाम एप्रिल महिन्यातच संपुष्टात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement

हमी भाव जाहीर करण्याची गरज

बेळगाव-खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन घेतले जाते. मात्र या भागात शेतकरी वर्गांना काजू विक्रीसाठी जवळपास बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे व्यापारी व काजू प्रक्रिया उद्योगाकडून शेतकऱ्यांची काजू कमी किमतीने खरेदी करण्यात येत आहे. मागील वर्षी 120 ते 125 रुपये प्रति किलो प्रमाणे काजूची खरेदी करण्यात येत होती. मात्र सध्या गोव्यासारख्या ठिकाणी काजू प्रति किलो 97 ते 100 रुपये प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्यामुळे काजू उत्पादकांना उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्कील बनले आहे. वास्तविक काजू बागांची साफसफाई करणे त्याचे आगीपासून संरक्षण करणे आणि काजू बिया गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांना  श्रम घ्यावे लागतात. तसेच मनुष्यबळाची सुद्धा आवश्यकता आहे. मात्र काजूला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गांना मोठ्या प्रमाणात आर्थिक  फटका सहन करावा लागतो. तरी शासनाने काजू पिकासाठी हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी या भागातील काजू उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे.

काजू उत्पादकांना नुकसानभरपाई द्या

मागील वर्षी काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे उत्पादकांना आर्थिक लाभ झाला होता. यावर्षी काजूसाठी प्रारंभापासून पोषक वातावरण असल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र यावर्षी देखील काजू उत्पादनाच्या ऐन हंगामातच प्रतिकूल वातावरणामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. यामुळे काजू उत्पादक आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. महसूल व बागायत खात्याने पाहणी करून काजू उत्पादकांना नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.