काजू उत्पादनात घट, काजू उत्पादक आर्थिक संकटात
प्रतिकूल वातावरणाचा परिणाम
त.भा.वार्ताहर
जांबोटी: चालू हंगामात वातावरणात झालेल्या बदलाचा प्रतिकूल परिणाम काजू पिकाच्या फळधारणेवर झाला असून काजू मोहर करपून गेल्यामुळे काजू उत्पादनात कमालीची घट झाली असल्यामुळे काजू उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
बेळगाव-खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात कोकणच्या धतींवर काजू उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे या भागात ओसाड माळरानावरील जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू लागवड करण्यात आली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासून काजू झाडे मोहराने बहरली होती. काजू बियांच्या फळधारणेसाठी पोषक वातावरण असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून काजूच्या फळधारणेच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. मात्र ऐन फेब्रुवारी महिन्यातच या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काजू पिकाच्या फळधारणेवर प्रतिकूल परिणाम झाला. ढगाळ वातावरण तसेच सकाळच्या वेळी पडणाऱ्या धुक्यामुळे संपूर्ण काजू मोहर करपून गेला. त्याचबरोबर उत्पादनही लांबणीवर पडले. यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीपासून काजू उत्पादनाच्या हंगामाला प्रारंभ झाल्यामुळे यावर्षी काजू उत्पादन आत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून उष्म्यामध्ये झालेली प्रचंड वाढ, तसेच ढगाळ वातावरण, रात्रीच्या वेळी पडणारे धुक्के, दव तसेच बदलत्या नैसर्गिक बदलाचा प्रतिकूल परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. एप्रिल महिन्यात ऐन बहरात असणारे काजू उत्पादन सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत असून यावर्षी काजू उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एरवी मे-जून महिन्यापर्यंत चालणारा काजू उत्पादनाचा हंगाम एप्रिल महिन्यातच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे उत्पादकांना आर्थिक लाभ झाला होता. काजू हे या भागातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. काजूपासून शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. शेतीसाठी रासायनिक खते, बी बियाणे, बाजारहाट, मुलांचे शिक्षण, विवाह आदींसाठी या भागातील शेतकऱ्यांना काजू उत्पादनातूनच आर्थिक पाठबळ मिळते. आर्थिक गरजा भागविण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना काजू पीक वरदान ठरले आहे. मात्र यावर्षी काजू उत्पादनात कमालीची घट झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्याप्रमाणात आर्थिक कचाट्यात सापडले आहेत. काजू बागांची साफसफाई करणे, त्यांचे आगीपासून संरक्षण करणे तसेच काजू बिया गोळा करणे यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणात येतो. मात्र यावर्षी उत्पादनात घट झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चदेखील मिळणे मुश्किल झाले आहे. तरी महसूल व बागायत खात्याने पाहणी करून महाराष्ट्राच्या धर्तीवर काजू उत्पादकांना अर्थिक नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी होत आहे.