देशातील बँकांमध्ये 1.50 लाख कोटी कॅशचा तुटवडा
वृत्तसंस्था/मुंबई
देशातील बँकांमध्ये कॅशचा (रोख रकमेचा) तुटवडा पुन्हा एकदा वाढला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात देशातील बँकिंग व्यवस्थेत कॅश रकमेची कमतरता 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याला तोंड देण्यासाठी बँका ठेवी वाढवत असल्याची माहिती आहे. परिणामी ठेवींचे व्याजदर 7.50 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत.काही बँकांनी जास्तीत जास्त व्याजदर असलेल्या नवीन योजनांची अंतिम तारीख वाढवली आहे तर काहींनी नवीन एफडी योजना सुरू केल्या आहेत.
आयडीबीआय सारख्या बँका ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 0.65 टक्क्यां पर्यंत अधिक व्याजदर देत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 8.05 टक्केपर्यंत वाढले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँकांचा रोख अधिशेष 1 लाख कोटी रुपये होता. गेल्या पंधरवड्यात कर भरण्यासाठी पैसे काढण्याचे प्रमाण कमी झाले आणि परकीय चलन बाजारात रिझर्व्ह बँकेचे लक्ष यामुळे रोख रक्कम कमी झाली. बंधन बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ सिद्धार्थ संन्याल म्हणाले की, आता दर वाढवून ठेवी वाढवण्याचा दबाव वाढला आहे.
बँकांनी रिझर्व्ह बँकेला बँकांमध्ये रोख रक्कम वाढवण्यासाठी डॉलर-रुपया स्वॅपचा अवलंब करून तरलता वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने डॉलर-रुपया स्वॅपचा वापर केला. आरबीआयने सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या स्वॅपचा वापर केला. यामुळे बँकांना सुमारे 25,970 कोटी रुपयांची रोकड मिळाली. स्वॅपची परिपक्वता 3, 6 आणि 12 महिने आहे. परंतु हे पुरेसे नाही. त्यांना सुमारे 1.25 लाख रोख आणि त्याहून अधिक रक्कम हवी आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 27 डिसेंबर 2024 पर्यंत बँकांच्या ठेवींमध्ये 9.8 टक्के दराने वाढ झाली. दरम्यान, कर्जवाढीचा दर म्हणजेच कर्जवाटप 11.16 टक्के प्रतिवर्ष होते. एकूण ठेवी 220.6 लाख कोटींवर पोहोचल्या आणि कर्ज 177.43 लाख कोटींवर पोहोचले. म्हणजेच, बँका प्रत्येक 100 रुपयांच्या ठेवीवर 80 रुपयांचे कर्ज वाटप करत आहेत. 2023 मध्ये क्रेडिट टू डिपॉझिट रेशो 79 टक्के होता, जो 73 टक्के असावा.