सोशल मीडियावर बनावट खाते काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल
कोल्हापूर :
सोशल मीडियावर उमेदवारांच्या नावे बनावट खाते काढून खालच्या पातळीवर बदनामी करणे, धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. बदनामी करणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी सायबर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असुन जुना राजवाडा व शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. एखाद्याच्या विरोधात बदनामीकारक व्हिडिओ अथवा मॅसेज फॉरवर्ड करू नये, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारालाही वेग आला आहे. ठिकठिकाणी जाहीर सभा, गाठीभेटी, भाषणे आदींद्वारे प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाचा वापरही अधिक वाढला आहे. सध्या सोशल मिडीयामध्ये बनावट अकाऊंट काढून त्याद्वारे एकमेकांच्या विरूध्द प्रक्षोभक, वादग्रस्त व बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्याची प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सायबर पोलीस ठाणेस अशा बनावट अकाऊंट धारकांचा शोध घेण्याची मोहीम राबवून त्यांचेविरूध्द कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. नागरिकांनीही अशी एखादी पोस्ट आल्यास तत्काळ डिलीट करावी किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.
जिह्यातील लोकप्रतिनिधींचे नांवे खोटे इंस्टाग्राम अकाऊंटस् काढून त्याद्वारे सामाजिक शांतता भंग होईल तसेच लोकप्रतिनिधींची वैयक्तिक बदनामी होईल अशा पोस्ट, व्हीडीओ शेअर करण्याचे प्रकार वाढले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रारीचे स्वरुप आणि गांभीर्य ओळखून सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना तक्रारीतील अज्ञात अकाऊंट धारक यांचा शोध घेवून त्यांचे वर सामाजिक शांतता भंग करण्याच्या हेतूने सोशल मिडीया अकाऊंट चालविलेबाबत कारवाई करणेबाबत सुचना दिल्या आहेत.
आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नका : अन्यथा कठोर कारवाई
निवडणुकीमध्ये सोशल मिडीयावर आक्षेपार्ह रिल्स, पोस्टमुळे कोणाच्याही लौकिकास बाधा पोहचवून शांतता भंग होईल असे मेसेज पाठवून, शेअर करून व्हायरल करू नये, असे करताना कोणी आढल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसे आढळल्यास संबंधित पोलीस ठाणे अथवा सायबर पोलीस ठाण्याशी संपकं साधावा.