मोहन बेळगुंदकर, प्रणय शेट्टीसह संशयितांवर गुन्हे दाखल
शाहूनगर येथील प्लॉटच्या वादातून मारामारी : परस्परविरोधी तक्रार दाखल
बेळगाव : शाहूनगर येथील प्लॉटच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून याप्रकरणी मंगळवार दि. 4 रोजी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यल्लाप्पा लक्ष्मण जाधव (रा. शाहूनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रणय शेट्टी, राहुल पाटील, चिदंबर देशपांडे यांच्यासह जेसीबी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे, तर चिदंबर प्रभाकर देशपांडे (रा. टिळकवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यल्लाप्पा जाधव व कुटुंबीय, मोहन रेमजी बेळगुंदकर यांच्यासह 10 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
शाहूनगर येथील सर्व्हे नं. 60/2 मधील प्लॉटवरून वरील दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. त्यामध्ये यल्लाप्पा लक्ष्मण जाधव हे बांधकाम करत होते. त्याला चिदंबर देशपांडे यांनी आक्षेप घेतल्याने त्यांना 14 डिसेंबर रोजी मारहाण झाली होती. त्यामुळे मंगळवारी चिदंबर देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यल्लाप्पा जाधव, मोहन बेळगुंदकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावेळी यल्लाप्पा जाधव यांनाही मारहाण झाली होती. त्यामुळे यल्लाप्पा यांनीही मंगळवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दोन्ही गटांच्यावतीने महिन्यानंतर पोलिसांत फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. यामध्ये माजी नगरसेवक मोहन रेमजी बेळगुंदकर आणि भाजप कार्यकर्ते प्रणय शेट्टी यांचा सहभाग असल्याने याप्रकरणाची चर्चा शहरात सुरू आहे. अद्याप याप्रकरणी कोणाला अटक झाली नसली तरी पोलिसांनी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांच्या अटकेसाठी प्रयत्न चालविले आहेत. पोलीस निरीक्षक उस्मान अवटी पुढील तपास करीत आहेत.