आरगेत डीजेचा दणदणात करणाऱ्या नऊ मंडळांवर गुन्हा
चार बेस चार टॉप लावल्याचा प्रकार, ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी मिरज
गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्याचे व डी.जे. वापरताना एक बेस व एक टॉप या मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन करूनही नियमभंग करणाऱ्या मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आरग (ता. मिरज) येथील 9 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
शुक्रवारी आरग येथे 5 दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत 9 मंडळांनी 4 बेस व 2 टॉप अशा मोठ्या क्षमतेच्या डी.जे. सिस्टमचा वापर केल्याने गावात प्रचंड ध्वनी प्रदूषण झाले. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागला. डेसिबल मीटरवर आवाजाची मर्यादा तपासली असता ती प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन संबंधित मंडळांच्या डी.जे.चे डेसिबल मीटरद्वारे रिडींग घेतले व अध्यक्ष व साऊंड सिस्टम मालकांवर गुन्हे दाखल केले.
कारवाई केलेल्या मंडळांमध्ये बिरदेव तरुण मंडळ - अध्यक्ष विकास टाकळे, डी.जे. मालक रोहित जमाले (कराड) सत्यप्रेमी मंडळ - अध्यक्ष सचिन पाटील, रुद्र ऑडिओ मालक संतोष नागठाणे (आरग) हिंदवी मंडळ - अध्यक्ष प्रतिक शेट्टी, डी.एस.प्लस साऊंड मालक आदित्य शेळके (बागणी) श्री गणेश मंडळ - सर्जेराव पाटील, अरमान डी.टी. साऊंड मालक राजू मुल्ला (पलूस) नवज्योत मंडळ - अध्यक्ष अभिषेक नुलके, योद्धा साऊंड बेडग मालक राहुल कणसे (बेडग) वीर गर्जना मंडळ - अध्यक्ष रामचंद्र नाईक, आर.डी.एक्स. साऊंड काके मालक अजित भिमराव (कोल्हापूर) नवरत्न मंडळ - अध्यक्ष विश्वजीत देसाई, मोरया साऊंड मुंढे मालक संकेत एडके (सातारा) एकता मंडळ - अध्यक्ष शितल शेटे, एकदंत ऑडिओ सातारा मालक सुरज कदम (खेड, सातारा) तरुण मित्र मंडळ - अध्यक्ष अक्षय उपाध्ये, माऊली फलटण साऊंड मालक आदिनाथ जगताप (फलटण) अशा नऊ गणेश मंडळांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत संकपाळ, वैभव पाटील, पांडुरंग मुंडे, अमित खोत, संभाजी पवार, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले व अन्य पथकाने केली. पुढेही नियम मोडण्राया मंडळांवर व डी.जे. मालकांवर डेसिबल मीटरद्वारे तपासणी करून गुन्हे दाखल व साहित्य जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपाधीक्षक अजित कोकाटे यांनी दिला.