डिंपल यादव यांच्या रोड शोप्रकरणी गुन्हा नोंद
रोड शोवेळी आचारसंहितेचे उल्लंघन
वृत्तसंस्था/ अयोध्या
समाजवादी पक्षाच्या स्टार प्रचारक खासदार डिंपल यादव यांच्या रोड शोप्रकरणी उत्तरप्रदेशातील इनायतनगर पोलीस स्थानकात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रोड शोदरम्यान अनुमतीपेक्षा अधिक वाहनांचा वापर करण्यात आला होता. यामुळे रायबरेली महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप आहे.
सप नेत्या डिंपल यादव यांनी मिल्कीपूर पोटनिवडणुकीकरता सप उमेदवार अजित प्रसादच्या समर्थनार्थ रोड शो केला आहे. या रोड शोमध्ये 150 दुचाकी आणि 150 चारचाकी वाहनांनी भाग घेतला होता. तर ताफ्यासाठी एकूण 85 वाहनांच्या वापराची अनुमती देण्यात आली होती. तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापरही मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात झाल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 330 वर दोन्ही बाजूने सप कार्यकर्त्यांनी वाहने नेल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडी झाली. तर रोड शोसाठी केवळ महामार्गाच्या केवळ एका बाजूच्या वापराची अनुमती देण्यात आली होती.