शिवतीर्थ परिसरात बॅनर लावणाऱ्यावर गुन्हा दाखल
सातारा :
सातारा पालिकेच्यावतीने अनेकदा बॅनरबाबत प्रबोधन करुनही पुन्हा अतिउत्साही कार्यकर्ते तेथेच बॅनर लावून शुभेच्छा देत असतात. अशाच एका कार्यकर्त्यास बॅनर लावून शुभेच्छा देणे अंगलट आले आहे. त्याच्यावर सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या प्रमुखांनी शिवतीर्थ परिसरात बॅनर लावल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून त्याचे नाव यशवंत सदाशिव चव्हाण (रा. करंजे तर्फ म्हसवे रोड) असे आहे. दरम्यान, पालिकेने नोटीस बजावताच बॅनरवाल्याचे धाबे दणाणले असून त्यांनी स्वत:हून बॅनर काढण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातारा जिल्हाधिकारी यांनी दि. 22 नोव्हेंबर रोजी पी.आय.एल. 155 नुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शहरातील अनाधिकृत होर्डिग, बॅनर, फ्लेक्स आढळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सातारा पालिकेचा अतिक्रण हटाव विभागाचे पथक दि. 23 नोव्हेंबर ते दि. 30 नोव्हेंबर पाहणी करत होते. तेव्हा त्या पथकास शिवतीर्थ परिसरात डीसीसी बँकेच्या कोपऱ्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छाचा बॅनर दिसला. तो बॅनर हटवला. त्या बॅनरची चौकशी केली असता तो बॅनर यशवंत सदाशिव चव्हाण रा. करंजे तर्फ म्हसवे रोड याने लावल्याचे समजले.
तो बॅनर श्री. छ. शिवाजी महाराज स्मारकाच्या परिसरात 100 मीटर अंतरावर नो फ्लेक्स झोन असताना तेथे अनाधिकृत बॅनर लावला गेला होता. त्यावरुन महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध कायदा 1995 चे कलम 3, भा. न्यायसंहिता कलम 223 प्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
दरम्यान, सातारा पालिकेच्यावतीने अगोदर बेकायदेशीर बॅनरवाल्यांना नोटीस बजावली होती. त्यातच पालिकेच्यावतीने गुन्हा दाखल केल्याचे समजताच बॅनरवाल्यांनी स्वत:हून बॅनर काढायला सुरुवात केली आहे.
कारवाईला उद्या होणार सुरुवात
शहरात ज्या मोडकळीस आलेल्या, वर्षानुवर्ष बंद अवस्थेत असलेल्या टपऱ्या, हातगाड्या रस्त्यात आहेत. त्या टपऱ्या हटवण्याची मोहिम दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाकडून करण्यात येणार आहे. पालिकेची ही कारवाई मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सुचनुसार करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी दिली आहे.