साताऱ्यातील पार्टी बहाद्दरांवर गुन्हा दाखल
सातारा :
साताऱ्यातील ‘तरुण भारत’ने उघड केलेल्या कथित रेव्ह पार्टीचा बुधवारीच पर्दाफाश झाला. गेली 48 तास मूग गिळलेल्या पोलीस प्रशासनाला गुरुवारी तोंड उघडावे लागले. इतकेच काय गुरुवारी संबंधित घटनेचा गुन्हा दाखल झाला असून यात काही जणांना अटक करण्यात आले असून कित्येकजण फरार आहेत. दरम्यान, याप्रकरणी नृत्यांगणा नाचवल्या ही कबुली मेढा पोलिसांना द्यावी लागली आहे. तर गुन्हा दाखल करतानाही कातडी बचाव पवित्रा घेतलेल्याचा स्वतंत्राने ‘तरुण भारत’ पाठपुरावा करणारच आहे.
साताऱ्याचे नंदनवन असलेल्या कास पठाराला गालबोट लावले जात आहे. या भागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याचे प्रकरण ‘तरुण भारत’ने गुरूवारी प्रसिद्ध करताच साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली.
‘तरुण भारत’चे वार्तांकन तंतोतंत खरे
गुरूवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात तरुण भारतने सूचकपणे सगळेच पुरावे मांडले होते. ते सातारा पोलिसांना तंतोतंत मान्य करावे लागले. या वृत्तात कास पठारावरील हॉटेल जय मल्हार आणि साताऱ्यातील कुविख्यात गुंड समीर कच्छी यांचा उल्लेख होता. गुन्हा दाखल करताना या साऱ्याच गोष्टींची पोलीस प्रशासनाला दखल घ्यावी लागली.
अखेर गुन्हा दाखल झाला
‘तरुण भारत’च्या रेट्यामुळे मेढा पोलीस ठाण्याचे पृथ्वीराज ताटे यांची अचानक चक्रे फिरू लागली. 12 तासाच्या आतच त्यांनी प्रतिक बापुराव दळवी (वय 21 रा. जकातवाडी) याला फिर्यादी बनवत पाच जणांवर गुन्हा दाखल केला. यात श्रेयस श्रीधर भोसले, सोन्या (पूर्ण नाव माहित नाही), रोहन जाधव (पत्ता माहित नाही), अमर पवार (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), आणि सर्वात महत्वाचा असलेला आरोपी समीर सलीम कच्छी (रा. सैदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील काही जणांना अटक केल्याचे मेढा पोलिसांनी सांगितले आहे.
‘तरुण भारत’प्रमाणेच मेढा पोलिसांची कबुली
घडलेला सारा प्रकार साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्राला धक्कादायक होता. गुरूवारी सकाळी कानावर हात ठेवलेल्या पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटेंसह मेढा पोलिसांना गुडघ्यावर यावे लागले. काहीच घडले नाही असा थाट दाखवणाऱ्यांना गुन्हा नोंद करताना नृत्यांगना नाचवल्या, बिअरबारच्या बाटल्या फोडल्या हे सारेच कबूल करावे लागले. दाखल झालेल्या प्रकारामध्ये कोण कोणत्या गुन्ह्यांचा अंतर्भाव करण्यात आला आणि किती गांभिर्य राखण्यात आले याचा उलघडा उद्याच्या अंकात होईल. त्यावरुन या गुन्ह्याला अभय देण्याचा संशय असलेले पृथ्वीराज ताटे यांच्या बाबतही कास पठारावरील ग्रामस्थ व हॉटेल व्यावसायिकांची धारणा समोर येईल.
तरुण भारतवर अभिनंदनाचा ठराव
तरुण भारतने नेहमीच सातारा जिल्ह्यात सामाजिक भूमिकेचा पाठपुरावा केला आहे. साताऱ्यातील कास पठाराची होत असलेली बदनामी चर्चेचा विषय असला तरी त्याची प्रत्यक्षात मांडणी करण्यात आली नव्हती. बुधवारी गांभिर्य ओळखून तरुण भारतने या साऱ्या प्रकारावर प्रहार केला. त्याला सातारा जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. दिवसभरात तरुण भारतवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता.
गांभिर्याने चौकशी सुरू आहे-समीर शेख
मेढा पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये दि. 8 रोजी काही लोकांची भांडणे झाली. या माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांना गांभीर्यपूर्वक चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वाई उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या अहवालानुसार कारवाई केली जाणार आहे. मेढा पोलीसही याबाबत मूळापर्यंत जावून चौकशी करत आहेत. आणि यातील दोषींवर गुन्हा दाखल करुन अटक करणार आहे.