रिसाला कॅफेच्या मालकावर गुन्हा दाखल सांगली पोलीस आणि शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने केलेल्या झाडाझडतीनंतर केली कारवाई
| त. भा. प्रतिनिधी
सांगली : अवैध कॅफेप्रकरणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने पोलिसांसमक्ष केलेल्या झाडाझडतीनंतर शहर पोलिसांनी रिसाला कॅफेचे मालक शैलेश विलासराव पवार (रा. कोल्हापूर रस्ता, सौरभ हॉटेल, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने शुक्रवारी विश्रामबाग परिसर व शहर परिसरातील कॅफेवर धडक मारली. कारवाईच्या भीतीने बऱ्याच कॅफे चालकांनी पलायन केले होते. तरीही जे कॅफे सुरू होते, तेथे जाऊन कार्यकर्त्यांनी कॅफे चालकांना जाब विचारला. काही कॅफेमध्ये पडदे लावून आडोसा निर्माण केला होता. काही कॅफेमध्ये लैंगिक चाळे करण्यासाठी छोटे बिछाने टाकले होते. संघटनेकडून पंचनामा सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना कॅफेमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम आढळून येत असल्याचे दाखवून दिले. हा प्रकार पाहून पोलीस चक्रावले.
रिसाला कॅफे मालकाने कोणतीही परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे झाडाझडतीवेळी आढळून आले. त्यामुळे पोलीस कर्मचारी जयवंत येसादे यांनी बीएनएस २२३ प्रमाणे शैलेश पवार यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.