कल्लडक प्रभाकर भट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
बेंगळूर : पुत्तूर तालुक्मयातील एका रहिवाशाने दाखल केलेल्या तक्रारीवरून आरएसएस नेते कल्लडक प्रभाकर भट आणि उप्पळीगे येथे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमाच्या आयोजकांविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. रविवारी पुत्तूर ग्रामीण पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, एका युट्यूब न्यूज चॅनेलवर प्रसारित झालेले भट यांचे भाषण ‘धार्मिक द्वेष भडकवते, महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करते आणि सार्वजनिक शांतता भंग करते’ असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 20 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. भट यांनी हिंदू आणि मुस्लिम समुदायांबद्दल अपमानास्पद टिप्पणी करत मतदारांची संख्या नमूद केली. यामुळे धार्मिक शत्रुत्वाला चालना देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 25 ऑक्टोबर रोजी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांखाली द्वेष पसरवणे, धार्मिक श्र्रद्धेचा अपमान करणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.