माजी आमदार वैभव नाईकांवर गुन्हा दाखल
महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्याला मारहाण प्रकरण ; कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद
कुडाळ -
मुंबई - गोवा महामार्गावर झाराप - तिठा येथे मंगळवारी झालेल्या दुचाकी आणि कार अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरल्याने तेथे आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक ( रा.कणकवली) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद महामार्गाचे कनिष्ठ अभियंता ( राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी ) मुकेश राकेश साळुंके (33, रा.सध्या रा. पिंगुळी - आनंदवन, मूळ रा. धुळे ) यांनी पोलिसात दिली. मंगळवारी दुपारी महामार्गावर झाराप - तिठा येथे कार व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला.यात दुचाकीवरील शाळकरी विद्यार्थी लवू उर्फ राज पेडणेकर ( 15 , रा.साळगाव - नाईकवाडी ) याचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या जमावाने महामार्ग रोखून धरला होता. तेथील मिडलकट कायमस्वरूपी तात्काळ बंद करावा. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यत महामार्गावरून हटणार नाही,अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थानी घेतली होती. महामार्गाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता (सावंतवाडी ) वृषाली पाटील यांच्यासमवेत कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके घटनास्थळी दाखल झाले. घटना समजताच माजी आमदार वैभव नाईक हेही तेथे आले होते. या दरम्यान,सायंकाळी 5 ते 5.15 वाजण्याच्या सुमारास माजी आमदार श्री नाईक यांनी आपणाला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद श्री साळुंके यांनी सायंकाळी उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीनुसार, साळुंके महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी वृषाली पाटील यांच्या समवेत महामार्गावर झाराप तिठा येथे कर्तव्य बजावत होते. तेव्हा कोणतेही कारण नसताना माजी आमदार श्री नाईक यांनी हाताने त्यांच्या गालावर व कानावर मारहाण करून कुठून आणता रे यांना भरती करून ,"असे बोलून जातीवाचक शब्द वापरले.तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेलास ,तर ठार मारण्याची धमकी दिली दरम्यान, या फिर्यादीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी (सावंतवाडी ) विनोद कांबळे , कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व सहायक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आणि याबाबत माहिती घेतली. त्यानंतर काल रात्री माजी आमदार श्री नाईक यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 121,132,352,351(3), अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3 (2) (va), 3 (1) (r), 3 (1)(s) प्रमाणे कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कांबळे तपास करीत आहेत.