कॅम्प येथील पंधरा लाखांच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा
दोन महिलांना अटक, चोरीचा मुद्देमाल जप्त : दुसऱ्या महिलेने 2 लाख 80 हजार रुपयाचे दागिन्यांवर उचलले होते कर्ज
बेळगाव : खानापूर रोड, कॅम्प येथील एका शिक्षिकेच्या घरातील चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. घरकाम करणाऱ्या महिलेसह तिला मदत करणाऱ्या आणखी एका महिलेलाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 28 जानेवारी रोजी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. सिलीन ऑस्कर डिसोजा या शिक्षिकेच्या घरात चोरी झाली होती. घरकाम करणाऱ्या महिलेवर त्यांनी संशय व्यक्त केला होता. केवळ चार दिवसांत या प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. सिलीन यांच्या घरी काम करणाऱ्या कामाक्षी संजय भोगे (वय 45) राहणार मोची गल्ली, तेलगू कॉलनी, कॅम्प, रमिजा अब्दुलमजीद बेपारी (वय 57) राहणार काकर स्ट्रीट, कॅम्प अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद वणकुद्रे, उपनिरीक्षक ए. रुक्मिणी, बसवराज उज्जीनकोप, वाय. एम. मुनवळ्ळी, बी. ए. करेगार, जे. एस. लमाणी, एन. एम. तेली, गौरी मठद व तांत्रिक विभागाचे आर. एस. अक्की, एम. एस. काशिद आदींनी ही कारवाई केली आहे. दि. 5 जुलै 2025 च्या सकाळी 9 पासून 27 जानेवारी 2026 च्या सायंकाळी 6 या वेळेत सिलीन यांच्या घरातील सोन्याची एक चेन व चार बांगड्या पळविण्यात आल्या होत्या. या दागिन्यांची किंमत 15 लाख 4 हजार रुपये इतकी आहे. शिक्षिकेने व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी सुरुवातीला कामाक्षीला अटक करून तिची चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली.
अखेर चोरीचा उलगडा
घरकाम करणाऱ्या महिलेने चोरी केली असली तरी दागिने कोठे आहेत? याचा उलगडा होत नव्हता. यापैकी एक दागिना ठेवून रमिजा बेपारी या महिलेने 2 लाख 80 हजार रुपये कर्ज उचलले होते. चोरीचे दागिने जर कामाक्षीच्या नावे एखादी बँक किंवा सोसायटीत ठेवल्यास पोलीस सहजपणे शोधून काढणार म्हणून रमिजाच्या नावे दागिना ठेवून पैसे काढण्यात आले होते. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी आदींनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.