‘आरव फार्मा’ विरोधात गुन्हा नोंद
बनावट सर्पदंश औषध आरोग्य खात्याला विकल्याचा आरोप : बनावट सर्पविषाचा साठा जप्त
पणजी : बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषध पुरवून आरोग्य खात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी सांताक्रूझ येथील ‘आरव फार्मा’ औषध वितरण कंपनीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. औषध विभागाचे उपसंचालक डॉ. शाहीन सय्यद यांनी आरोग्य विभागाच्या वतीने या फार्मा कंपनीविरुद्ध बनावट लायोफिलाइज्ड (फ्रीझ-ड्राय) हे सर्पदंश प्रतिबंधक औषध पुरवल्याबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांनी अप्रामाणिकपणे आरोग्य खात्याला या औषधांचे विन्स बायोप्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने उत्पादन केल्याचे चुकीचे सादरीकरण केले आणि आपल्या फायद्यासाठी त्यांच्या संमतीशिवाय जाणूनबुजून विन्स बायोप्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लेबल्स आणि पॅकेजिंगचा वापर करून बनावट औषध विकले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य खात्याला विकलेले उत्पादन कंपनीने उत्पादित केले नव्हते, मात्र फसवेगिरी करून आरोग्य खात्याला 4.9 लाख रुपयांची औषधे खरेदी करण्याचा आदेश देण्यास आणि बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषधे स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. निरीक्षक विजयकुमार चोडणकर म्हणाले की, पणजी पोलिसांनी फसवणूक केल्याबद्दल आणि कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तेलंगण राज्यातील एका मूळ औषध उत्पादक कंपनीने केंद्रीय अन्न आणि औषधालय प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात आल्याचे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.
त्यांच्या लेबलचा वापर करून संशयास्पद सर्पदंश प्रतिबंधक औषध आरोग्य खात्याला पुरवण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य अन्न औषध प्रशासनाने अलीकडेच संशयास्पद बनावट सर्पविषाच्या 1 हजार 80 शीशांचा साठा जप्त केला असून त्याचे नमूने चाचणीसाठी पाठवले आहेत. सर्पदंश प्रतिबंधक औषध हे एक अतिशय संवेदनशील, जीवनरक्षक औषध आहे जे एका जटिल आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून तयार केले जाते. ते रेफ्रिजरेटरमध्ये साठवले पाहिजे आणि वाहून नेले पाहिजे आणि त्याच्याशी छेडछाड केली जाऊ शकत नाही, असे एका डॉक्टरने सांगितले.