For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नीट’प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

06:55 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘नीट’प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल
Advertisement

बिहार-गुजरातमध्ये तपासासाठी पथके रवाना : अनियमिततेची शिक्षण मंत्रालयाकडून गंभीर दखल 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय)  ‘नीट-युजी’मधील गोंधळाबाबत रविवारी पहिला गुन्हा (एफआयआर) नोंदवला.  सीबीआयने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. सीबीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच यासंबंधी माहिती देण्यात आली. आता पुढील तपासासाठी सीबीआयची विशेष पथके बिहारमधील पाटणा आणि गुजरातमधील गोध्रा येथे पाठवण्यात आली आहेत.

Advertisement

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘नीट-युजी’मधील अनियमिततेची गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. आता सीबीआयने गुन्हेगारी कट आणि फसवणुकीसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. 5 मे रोजी झालेल्या नीट-युजी परीक्षांमध्ये कथित अनियमितता आणि फसवणुकीची प्रकरणे समोर आल्याचे शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने विशेष पथके तयार केली आहेत. ही टीम बिहारमधील पाटणा आणि गुजरातमधील गोध्रा येथे पाठवली आहेत. याप्रकरणी पाटणा आणि गोध्रा येथे स्थानिक पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. मात्र, आता स्थानिक यंत्रणांकडून हा तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला जाणार आहे.

बिहारमधील नवादा येथे सीबीआय पथकावर हल्ला

नीटमधील गोंधळाबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर तपासासाठी बिहारमध्ये पोहोचलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने सर्व अधिकारी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून हल्ला करण्यासाठी जमलेल्या 200 हून अधिक अज्ञातांवर स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अन्य राज्यांमध्येही तपास

‘नीट’ परीक्षांमधील गोंधळाबाबत बिहार पोलिसांनी याप्रकरणी काही लोकांना अटकही केली आहे. ‘नीट’ पेपर लीकचे धागेदोरे बिहार, गुजरात या राज्यांबरोबरच अन्य राज्यांमध्येही असल्याचे उघड होत आहे. महाराष्ट्रातही पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांची चौकशी केली आहे. नीट युजी पेपर लीक झाल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी केल्यानंतर चौकशीला गती आली आहे. बिहार पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांनी परीक्षेच्या एक दिवस आधी पेपर फुटल्याचे चौकशीत कबूल केले. पोलीस आता सॉल्व्हर गँगच्या लोकांचीही चौकशी करत आहेत.

एनटीए महासंचालकांची उचलबांगडी

अनियमिततेच्या तक्रारीनंतर केंद्र सरकारने नीट आणि युजीसी-नेट यासह अनेक महत्त्वाच्या परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना पदावरून हटवले आहे. तसेच, एनटीएमधील सुधारणांसाठी एक समिती नियुक्त करण्यात आली असून ते परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करेल. सदर समितीने पुढील दोन महिन्यात अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

24 लाख उमेदवारांनी दिली परीक्षा

नीट-युजी परीक्षा 5 मे रोजी 4,750 केंद्रांवर घेण्यात आली होती आणि त्यात सुमारे 24 लाख उमेदवार बसले होते. परीक्षेचा निकाल 14 जून रोजी जाहीर होणे अपेक्षित होते, परंतु उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आधी पूर्ण झाल्याने तो 4 जून रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, निकालानंतर 100 टक्के गुण घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर देशभरातील अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरू झाले होते. तसेच सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचले होते.

Advertisement
Tags :

.