घिसाड गल्ली येथील आगप्रकरणी दोघांवर गुन्हा
कोल्हापूर :
घिसाड गल्ली येथील आगप्रकरणी दोन व्यावसायिकांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नागरीवस्तीमध्ये विनापरवाना फटाक्यांचा साठा करणे, सुरक्षिततेची उपाययोजना न करणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. अमर निशिकांत मूग (वय 52, रा. जैन गल्ली), संजय विजयकांत मूग (वय 63, रा. नाना पाटील नगर, फुलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 24 लाख रुपयांचे फटाके जप्त केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, घिसाड गल्ली येथील फटाका गोडाऊनला गुरुवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये गोडाऊनच्या शेजारी असणारी पाच ते सहा घरे जळून खाक झाली. या घटनेमध्ये हातावरचे पोट असणाऱ्यांच्या संसारांची त्यांच्या डोळ्यादेखत राखरांगोळी झाली होती. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी याबाबतचा पंचनामा करुन रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे यांनी दिली.
- सावरण्याचा प्रयत्न
दस्तगीर खुतबुद्दीन मोमनी यांचे प्रापंचिक साहित्यासह 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. गणेश काळे यांचे 6 तोळे सोने, रोख रक्कम आणि प्रापंचिक साहित्य असा 6 लाखांचे नुकसान झाले. सुरेश चौगुले यांचे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रिक्षाचालक जमीर पन्हाळकर यांचे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, घर घेण्यासाठी आणलेले रोख 7 लाख रुपये जळून खाक झाले. अन्सार मुल्लाणी यांचे 8 तोळ्यांचे दागिने वितळले आहेत. या आगीनंतर पाच कुटूंबांचे केवळ अंगावर असणारे कपडेच शिल्लक राहिले होते. हे पाचही कुटुंब या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. गल्लीतील इतर रहिवाशी आणी नातेवाईक त्यांना मदतीचा हात देत आहेत.