डॉक्टरकडे खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा
सातारा :
साताऱ्यात पोक्सो प्रकरणात दुहेरी गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोक्सो गुह्यातील आरोपी डॉक्टरकडे फिर्यादीने गुन्हा मागे घेण्यासाठी 50 लाखाची मागणी केल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात एका वकिलासह दोन अल्पवयीन मुलींविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदरबझार परिसरातील एका क्लिनिकमध्ये अल्पवयीन बालिकेसोबत तपासणी करताना अश्लील वर्तन केल्याचा ठपका ठेवत 12 जुलै रोजी संबधित डॉक्टरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी डॉक्टरला अटकेची कारवाई झाली नव्हती. दरम्यान, नव्याने या घटनेत ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. पोक्सो गुह्यातील फिर्यादी, तिची बहीण आणि वकिल यांनी संबधित डॉक्टरकडे वारंवार पैशाची मागणी केल्याचे समोर आले आहे. पोक्सोच्या फिर्यादीने पैशाची मागणी ही डॉक्टरच्या वकिलाच्या ऑफीसमध्ये केली असल्याचं तक्रारीत नमूद केलं असून याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जयपत्रे करीत आहेत.