...अखेर पोर्लेच्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल
महिलेची गैवर्तन केल्याने गुन्हा दाखल
कोल्हापूरः (पन्हाळा)
सोमवारपासून गाजत असलेल्या पार्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील गावकामगार पोलीस पाटील बाजीराव शंकर इंगळे (वय वर्ष ३९) याच्यावर चार दिवसांनी पन्हाळा पोलिसात नाट्यमय घडामोडीने अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पीडित तरुणीने पोलीसांत विनयभंगाची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, चार दिवसांपूर्वी पन्हाळा पोलीस पेट्रोलिंग गस्त दरम्यान पीडित तरुणीच्या भावावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. या प्रकरणी संशयित आरोपी गावकामगार पोलीस पाटील बाजीराव इंगळे पिढीत तरूणीच्या घरी जाऊन तुझ्या भावावर पोलीसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी मी मदत करतो, त्यास सोडवून आणतो. म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते.
या घटनेने सोमवारी (१७ रोजी) पिढीत तरुणी पोलीसात तक्रार दाखल करण्यासाठी आली असता, काही लोकांनी तिच्यावर दबाव टाकून प्रकरण मिटवण्याचा डाव आखला. त्यामुळे त्या दिवशी पोलिसात फिर्याद दाखल झाली नाही. गुरूवारी सायंकाळी पीडीत तरूणी बाजारमधून येताना तिच्याकडे वाईट नजरेने इंगळे यांनी बघितल्याने गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत इंगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी इंगळे यांना पहाटे राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली. याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे देखील पाठवला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी सांगितले. दरम्यान पोलीस पाटील इंगळे याच्यावर गुन्हा नोंद व्हावा, म्हणून ग्रामस्थांनी गावबंद आंदोलन करून पोलीस पाटलाचा पुतळ्याचे दहन देखील केले होते.
मात्र पोलीस पाटील आणि पोलिसांचे संबंध असल्याने हे प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रकार होत होता. तसेच पोलीस पाटलावर गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र काही घडामोडींनंतर पन्हाळा पोलिसांनी अखेर पोलीस पाटील इंगळे याच्यावर गुन्हा दाखल केल्याने ग्रामस्थांच्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
पोलीस आणि नागरिक यांच्यातील पोलीस पाटील हा महत्त्वाचा दुवा असतो. पण कायद्याची रक्षकच कायद्याचे भक्षक बनल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. पोलीस पाटलावर गुन्हा नोंद झाल्यास आपल्याच खात्याची बदनामी होणार यामुळे आधी गुन्हा नोंद करण्यास आणि त्यानंतर पन्हाळा पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार यांच्याकडून प्रसार माध्यमांना उडवा उडवी ची उत्तरे देण्यात येत होती. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी सविस्तर माहिती दिली.