Ratnagiri News : शासकीय कामात अडथळा तरुणावर गुन्हा
चिपळूणः येथील नगर परिषदेचे सुरु असलेल्या पाणी योजनेच्या कामामध्ये अडथळा केल्याप्रकरणी सचिन शेट्ये (४०, चिपळूण) याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रविकांत सूर्यकांत सातपुते (४५, बांधकाम सहाय्यक, बांधकाम विभाग-चिपळूण नगर परिषद) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मार्कडी येथे चिपळूण नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेल्या कामासाठी खड्डा खणण्यात आला होता. असे असताना सचिन शेट्ये याने आपल्या अधिकारात जेसीबी चालक शांतीलाल जाधव यांच्याकडून जेसीबीने काढलेल्या खड्याची माती पुन्हा त्या खड्यात भरली.
तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले बॅरिगेट्स व चिपळूण नगर परिषद पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे असलेले सूचना फलक बाजूला करून रस्ता वाहनांकरीता खुला केला. या रस्त्यावरील खड्याच्या ठिकाणची माती ओली तसेच चिखलाची असल्याने रस्ता निसरडा झाला आहे. त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनामुळे खड्ड्यातील माती दबून अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल अशी कृती केली.