सायकल फेरी काढल्याने म. ए. समिती नेते, कार्यकर्त्यांवर गुन्हा
मार्केट पोलिसांची कारवाई : कर्नाटक विरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
विनापरवानगी 1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनाची सायकल फेरी काढण्यासह कर्नाटक सरकार विरोधात घोषणा दिल्याचा ठपका ठेवत मार्केट पोलिसांनी म. ए. समिती नेते व कार्यकर्त्यांवर सुमोटो गुन्हा दाखल केला आहे. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण-पाटील, अंकुश केसरकर व इतर 30 अनोळखी जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सरकारतर्फे मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांनी फिर्याद दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील 1 नोव्हेंबर रोजीच्या काळ्यादिनाच्या मूक सायकल फेरीला परवानगी देण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडे मध्यवर्ती म. ए. समितीकडून रितसर अर्ज करण्यात आला होता. मात्र नेहमीप्रमाणे ऐनवेळी फेरीला परवानगी नाकारल्याची नोटीस म. ए. समिती नेत्यांना आदल्यादिवशी देण्यात आली. मात्र ठरल्याप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजी सकाळी म. ए. समिती नेते व कार्यकर्ते संभाजी उद्यानात दाखल झाले. त्यानंतर दरवर्षीच्या मार्गावरून मूक सायकल फेरी काढण्यात आली. यंदाच्या सायकल फेरीत युवावर्गाची वाढलेली संख्या पाहून कन्नडिगांसह प्रशासनाच्या पायाखालील वाळू घसरली.
म. ए. समितीची ताकद आता कमी झाली आहे, ते आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत, फेरीत केवळ 300 लोक असतात, अशी उपहासात्मक टीका जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या टीकेला 1 नोव्हेंबरच्या जनसागराने जशास तसे उत्तर दिले. त्यातच मार्केट पोलिसांनी सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी रात्री 10.45 च्या सुमारास सुमोटो गुन्हा दाखल केला.
पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संभाजी उद्यानात 1 नोव्हेंबर रोजी म. ए. समितीच्या सायकल फेरीला परवानगी नाकारली असतानाही त्याचे उल्लंघन करत मिरवणुकीच्या माध्यमातून रस्त्यांवर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण केला. भविष्यात शहरात दंगली भडकाविण्याच्या उद्देशाने लोकांना चितावणी देऊन गुन्हेगारी कृत्य केले. तसेच महाराष्ट्र राज्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून कट रचला. सार्वजनिक शांतता भंग करून आणि भविष्यातही शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारच्या सार्वभौमत्वाचा व कन्नडिगांच्या भावनांचा भंग केला आहे. सर्वांनी हातमिळवणी करून महाराष्ट्राच्या बाजूने तर कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. बेळगाव आणि कर्नाटकातील भाग महाराष्ट्रात सामील करण्यात यावा, अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
