For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार मुनिरत्न यांच्या अडचणीत भर

10:26 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमदार मुनिरत्न यांच्या अडचणीत भर
Advertisement

अत्याचार, धमकी, हनिट्रॅपचा आरोप

Advertisement

बेंगळूर : जात अवमानना आणि जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी कारागृहात असलेल्या भाजप आमदार मुनिरत्न नायडू यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अत्याचार, धमकी आणि हनिट्रॅपचा आरोप करत 40 वर्षीय एका महिलेने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर मुनिरत्न यांच्यासह 7 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी तपास हाती घेतला असून पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून कृत्य घडलेल्या ठिकाणी नेऊन पंचनामा केला. अत्याचार,हनिट्रॅपचा आरोप करत तक्रार दिलेल्या महिलेची पोलीस अधिकाऱ्यांनी  चौकशी केली.

घटनेसंबंधी आमदार मुनिरत्न, विजयकुमार, किरणकुमार, सुधाकर, लोहित, मंजुनाथ, लोकी या 7 जणांविरुद्ध रामनगर जिल्ह्यातील कग्गलीपूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. त्यांच्याविरुद्ध आयपीसी सेक्शन 354अ (लैंगिक शोषण), 354क (महिलेल्या इच्छेविरुद्ध चित्रिकरण), 376एन(2) (सरकारी कर्मचाऱ्याकडून अत्याचार), 506 (जीवे मारण्याची धमकी), 504 (जाणीवपूर्वक अवमान), 12ब अंतर्गत कारस्थान, 384 (वसुली), 308 (खुनाचा प्रयत्न), 406 (फसवणूक), आयटी अॅक्ट 66 आणि 66अ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी रामनगरचे एसपी कार्तिक रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे.

Advertisement

कोविड काळात केलेल्या मदतीविषयी समजल्यानंतर मुनिरत्न यांनी माझ्याशी संपर्क साधला. अधूनमधून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून सतावणूक केली. त्यांच्या मागणीला नकार दिल्यानंतर त्यांनी मला एका ठिकाणी बोलावून घेतले. तेथे गेल्यानंतर त्यांनी मिठी मारण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर राजकारणात या गोष्टी सामान्य असल्याचे सांगून अत्याचार केला. नंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृष्य एडिट करून व्हायरल करण्याची मला धमकी दिली. त्यांनी 2020 ते 2022 या कालावधीत सातत्याने अत्याचार केले. चित्रित केलेले व्हिडिओ दाखवून हनिट्रॅपसाठीही माझा वापर केला, असा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.

जामीन मंजूर, पण...

भाजप आमदार मुनिरत्न यांच्याविरुद्ध दोन प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकांवरील निकाल बुधवारी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने राखून ठेवला होता. गुरुवारी न्यायालयाने मुनिरत्न यांना सशर्त जामीन मंजूर केला. दोन लाखाचा बॉण्ड, दोघांची हमी, पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर हजर राहणे अशा अटी घातल्या आहेत. जामीन मिळाला तरी त्यांना अत्याचार प्रकरणात पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची कारागृहातून मुक्तता होणे शक्य नाही.

Advertisement
Tags :

.