चिपळुणात ‘टीडब्ल्यूजे’च्या मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
चिपळूण :
गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकासह त्याची संचालक पत्नी आणि प्रतिनिधी अशा चौघांविरोधात सोमवारी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ठेकेदाराने फिर्याद दिली असून त्याची व त्याच्या बहिणीची तब्बल 28 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कंपनीविरोधात ओरड सुरू असतानाच अखेर जिल्ह्यात पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. गुन्हा दाखल होताच गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत.
टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर, संचालक नेहा समीर नार्वेकर (दोघे गुहागर), प्रतिनिधी संकेश रामकृष्ण घाग (चिपळूण), सिद्धेश शिवाजी कदम (कामथे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद ठेकेदार प्रतिक दिलीप माटे (29, कामथे-माटेवाडी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर व संचालक असलेली त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांनी त्यांच्या टीडब्ल्यूजे असोसिएट कंपनीमध्ये प्रतिनिधी संकेश घाग व सिद्धेश कदम यांच्याद्वारे गुंतवण्यात आलेल्या रक्कमेवर दर महिन्याला 3 ते 4 टक्के परतावा देण्याचे आमिष प्रतिक माटे यांना दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये तसेच त्यांची बहीण तृप्ती दिलीप माटे हिच्याकडून एकूण 25 लाख 50 हजार रुपये इतकी गुंतवणूक जानेवारी 2023 रोजी शहरातील पागमळा येथील कंपनी कार्यालय इंटक भवन येथे करून घेतली होती. दरम्यान, मे 2025 नंतर प्रतिक माटे यांना कोणताही परतावा दिलेला नाही, तसेच त्याची मूळ रक्कमदेखील त्यांना दिलेली नाही. हा प्रकार माटे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबतचा सर्व तपास रत्नागिरीतील आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- चार महिन्यांपासून वेतन थांबले
या कंपनीची चिपळूण, गुहागर, पुणे येथे कार्यालये आहेत. 2018 पासून सुरू झालेल्या या कंपनीच्या चकचकीत कार्यालयात मोठा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो कोटी ऊपयांची गुंतवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अलिकडे या कंपनीच्या कारभाराबाबत अधूनमधून तक्रारी सुरुच होत्या. मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून गुंतवणूकदारांचा परतावा आणि कंपनीच्या हेल्थ आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबल्याने कंपनीतील गोंधळ समोर आला होता.
- गुंतवणूकदारांवर ओढवले आर्थिक संकट
जून महिन्यात काही गुंतवणूकदारांनी आपली व्यथा सांगणारे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. कर्ज काढून गुंतवणूक केली. पण आता परतावा मिळत नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या आपल्यावर मोठे संकट ओढवले असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, यवतमाळध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यानंतर पाठोपाठ चिपळुणात नार्वेकर दांपत्यासह दोन प्रतिनिधींवर गुन्हा दाखल झाला आहे. फसणुकीचा प्रकार उघडकीस येताच गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले असून पैसे मिळणार की बुडणार या विवंचनेने अनेकांची झोप उडाली आहे.
- मोबाईल ‘नॉट रिचेबल’
गुंतवणूक केलेल्यांमध्ये विशेष म्हणजे पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. त्यांनी या कंपनीमध्ये मोठ्या रक्कमा गुंतवल्या असून फसवणुकीची रक्कम शेकडो कोटींच्या घरात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या गुंतवणूदारांनी समीर नार्वेकर याच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती पुढे येत आहे.