उड्डाणपुलावर रिल्स बनवणाऱ्या 5 जणांवर गुन्हा
सातारा :
रिल्स बनवण्याच्या प्रयत्नात अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच पाटण तालुक्यातील सडा वाघापूर पठारावर रिल्ससाठी कारचा स्टंट करताना कार 300 फूट दरीत कोसळली. यात चालक गंभीर जखमी झाला होता. ही घटना ताजी असतानाच साताऱ्यात महामार्गावरील उड्डाणपुलावर नवीन गाडी घेतल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून व्हिडीओ शुटिंग करत रिल्स बनवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ओम प्रविण जाधव (वय 21, रा. जुना आर.टी. ओ चौक सातारा), कुशल सुभाष कदम (रा. सदरबझार जरंडेश्वर नाका सातारा), सोहम महेश शिंदे (वय 20, रा. शिंगणापूर ता. माण), निखील दामोदर महांगडे (वय 27, रा. परखंदी ता. वाई) व एक विधीसंघर्ष बालक यांच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील ओम प्रविण जाधव याने गुरूवारी नवीन स्कार्पिओ गाडी घेतली. ही स्कार्पिओ व थार अशा दोन गाड्या घेऊन ओम, कुशल कदम व सोहम शिंदे, निखील महांगडे व अल्पवयीन मुलगा सातारा बेंगलोर हायवेवरील कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या लेनवर गेले. येथे गाड्या उभ्या करून फोटो व रिल्स बनवू लागले. हे रिल्स बनवण्यासाठी त्यांनी ड्रोनचा वापर केला. यामुळे महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडी झाली होती. याची रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर व्हायरल केली. ही रिल्स व्हायरल होताच अनेकांनी उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या. या युवकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. यामुळे सातारा शहर डी. बी. पथक, सातारा वाहतूक नियंत्रण विभाग, भुईंज येथील महामार्ग पोलीस यांनी या रिल्सवरून संबंधितीत वाहन चालक, ड्रोन वापरणारे यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. तसेच त्यांचे अन्य साथीदार यांची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधिक्षक, डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, अभिजीत यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. हवा. सुजीत भोसले, सुहास पवार, रमेश शिखरे, निलेश जाधव, विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी केलेली आहे.
- आता गुन्हे दाखल होणार
सातारा जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की, नवीन वाहन खरेदी, लग्न समारंभ, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमामध्ये काही युवक हे जाणीवपूर्वक सामान्य लोकांना वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहनांचा वापर करून त्याचे चित्रिकरण करीत आहेत. व ते इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीयावर व्हायरल करीत आहेत. त्यांची माहिती घेवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.