मांसाहारी वृक्ष
वनस्पतींपासून निर्माण झालेले जे खाद्यपदार्थ असतात, त्यांच्या सेवनाला शाकाहार अशी संज्ञा आहे. तर प्राण्यापासून बनलेल्या पदार्थाच्या (दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सोडून) सेवनाला मांसाहार म्हणतात. तथापि, काही वनस्पती अशा आहेत, की ज्या स्वत:च मांसाहारी आहेत. या वनस्पतींचा जाळ्यात एकादा जीव सापडल्यास त्या त्याचे रक्त शोषून घेतात आणि त्याला पचवून टाकतात, असे दिसून आले आहे. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या घनदाट वर्षावनांमध्ये अशा अनेक वनस्पती आहेत. त्यांच्यावर संशोधक मोठ्या प्रमाणात अभ्यास करत आहेत.
नेपेंथीज नामक एक वनस्पती अशा प्रकारची मांसाहारी आहे. या वनस्पतीच्या पानांपासून पिशवीसारखा एक आकार निर्माण होतो. या पिशवीत या वनस्पतीचा रस साठतो. हा रस पिण्याच्या मोहाने अनेक कीटक या पिशवीकडे आकर्षित होतात आणि तिच्यात अडकतात. त्यानंतर या पिशवीच्या आतील टोकदार सुयीसारखी अग्रे या कीटकांचे शोषण करतात. कीटकांच्या अंगातील रक्त आणि पाणी किंवा अन्य पदार्थ ही वनस्पती शोषून घेतले आणि अखेर या कीटकांचा अंत होतो. अशा प्रकारे ही वनस्पती या कीटकांना पचवून टाकते. या वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषण द्रव्ये ती अशा प्रकारे कीटकांचे शोषण करुन मिळवते. कोळी, डास किंवा मधमाश्या यांच्यासारखे कीटक या पिशवीत गेले, की बाहेर येऊच शकत नाहीत. ते या पिशवीतील रसात जवळपास विरघळूनच जातात आणि नंतर या वनस्पतीकडून ते शोषले जातात. या नेपेंथीज वनस्पतीच्या अनेक प्रजाती आहेत. त्यांच्यापैकी सर्वात मोठी प्रजाती नेपेंथीज किंग किंवा नेपेंथीज राजा या नावाने परिचित आहे. तिच्यावरच्या पिशव्या इतक्या मोठ्या असतात की त्यांच्यात उंदीर किंवा खारीसारखा मोठा प्राणीही अडकू शकतो. नंतर ही वनस्पती त्यालाही पचवून टाकते. व्हीनस फ्लायट्रॅप आणि सनड्यू या नावाने परिचित असलेल्या काही अन्य वनस्पतीही अशा प्रकारे ‘मांसाहारी’ असल्याचे दिसून येते.