गोव्यात 28पासून कार्निव्हल
पहिली मिरवणूक पर्वरीत : बाणावलीचे क्लिवेन मॅथ्यू फर्नांडिस ‘किंग मोमो’
पणजी : राज्यातील कार्निव्हलचे वेळापत्रक पर्यटन खात्याने जाहीर केले असून तो 28 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत होणार आहे. क्लिवेन मॅथ्यू फर्नांडिस (बाणावली) यांची कार्निव्हलचे ‘किंग मोमो’ म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्निव्हलची सुरुवात पर्वरी येथून दि. 28 फेब्रुवारी रोजी होणार असून तेथे पहिली चित्ररथ मिरवणूक तथा स्पर्धा घेण्यात येणार आहे. पणजी येथे 1 मार्च रोजी तर मडगावला 2 मार्च रोजी, वास्को येथे 3 मार्च आणि 4 मार्च रोजी म्हापसा व मोरजी या ठिकाणी कार्निव्हल मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.
गोव्याची संस्कृती संगीतावर आधारित कार्निव्हल मिरवणूक होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची अपेक्षा पर्यटन खात्याने बाळगली आहे. पर्वरी येथे उड्डाणपुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे आणि बगल रस्त्याने वाहतूक वळवली असल्याने चित्ररथ मिरवणूक कोठे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोव्याची विभिन्न संस्कृती दाखवण्याचे कार्य कार्निव्हलमधून करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन खात्याने दिली आहे. सध्या पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू असून अनेक रस्ते बंद करण्यात आल्याने चित्ररथ मिरवणुकीच्या वेळी वाहतूक कोलमडण्याचा धोका आहे. सध्या वाहतूक व्यवस्था बिघडली असून ती कार्निव्हलमध्ये कशी होणार? याबाबत शंका आहे.