For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शनिवारपासून कार्निव्हलची धूम!

01:10 PM Feb 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
शनिवारपासून कार्निव्हलची धूम
Advertisement

पणजी : समस्त गोमंतकीयांना ‘खा, प्या आणि मजा करा’ असा संदेश देणारा कार्निव्हलचा राजा अर्थात ‘किंग मोमो’ म्हणून यंदा क्लिवेन मॅथ्यू फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे. शनिवार दि. 1 मार्चपासून कार्निव्हल सुरु होणार आहे. दि. 1 मार्च रोजी पणजीतून कार्निव्हलची सुऊवात होत असून दि. 2 रोजी मडगाव, दि. 3 रोजी वास्को आणि दि. 4 रोजी मोरजी व म्हापसा येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे. पर्वरी भागात फ्लायओव्हरचे बांधकाम सुरू असल्याने वाहनांच्या गर्दीचा विचार करून यंदा तेथील कार्निव्हल मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ‘किंग मोमो’ क्लिवेन मॅथ्यू फर्नांडिस यांच्यासह महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्निव्हलच्या अधिकृत गाण्याचेही अनावरण करण्यात आले.

Advertisement

गोव्याच्या अनोख्या परंपरांचे दर्शन घडवणारी आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणे, फ्लोट परेड, संगीत, आदी कार्यक्रमांचे या मिरवणुकीदरम्यान होणार आहेत. त्यावेळी देशविदेशातील हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत असे आरोलकर यांनी सांगितले. कार्निव्हलच्या मार्गाबद्दल माहिती देताना त्यांनी, पणजीतील मिरवणूक गतवर्षीच्याच मार्गाने जाईल. त्यावेळी वाहतूक एम. जी. रोडवरून वळविण्यात येणार आहेत. पोलिसांनी या संदर्भात स्वतंत्र योजना आखली आहे. त्याशिवाय स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली असून कोणत्याही अडचणी येणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे आरोलकर म्हणाले.

1965 मध्ये पहिल्यांदा कार्निव्हल

Advertisement

राज्यात 1965 मध्ये पहिल्यांदा कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पहिले किंग मोमो म्हणून पणजीतील तिमोतीओ फर्नांडीस यांची निवड झाली होती. त्यानंतर पुढील वर्षीही त्यांनाच संधी मिळाली होती. त्यानंतर प्रसिद्ध संगितकार बोंडो, लॉरेन्स, टोम यांनी किंग मोमो म्हणून कार्निव्हलवर राज्य केले. हे सर्व पणजीतील नागरिक होते. त्यापुढील वर्षात राज्याच्या अन्य भागातील नागरिकांमधून किंग मोमोची निवड करण्यात येऊ लागली. पुढे 2019 मध्ये आणि 2023 मध्ये पुन्हा एकदा पणजीतील नागरिकांची किंग मोमो म्हणून निवड करण्यात आली.

Advertisement
Tags :

.