For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजधानीत कार्निव्हलचा जल्लोष!

10:48 AM Feb 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजधानीत कार्निव्हलचा जल्लोष
Advertisement

‘किंग मोमो’ ची राजवट सुरू : ‘खा, प्या, मजा करा’चा दिला संदेश

Advertisement

पणजी : ‘खा, प्या, मजा करा’, असा संदेश देत ‘किंग मोमो’ ने कार्निव्हल मिरवणुकीची सुरुवात केली. त्याद्वारे राज्यात किंग मोमो ची राजवट सुरू झाली. पणजीत आयोजित चित्ररथ मिरवणुकीतील भव्यता आणि कलाकारांच्या नृत्याचा अविष्कार यांचा हजारो नागरिकांनी जल्लोषी वातावरणात अनुभव घेतला. गोवा पर्यटन खात्यातर्फे आयोजित या कार्निव्हल महोत्सवाची काल शनिवार दि. 14 फेब्रुवारी सुरूवात झाली. त्यातील पहिली मिरवणूक पणजीत मांडवी किनारी पार पडली. त्यासाठी दिवजा सर्कलपासून, सांता मोनिका जेटी, जुने सचिवालय मार्गे कला अकादमीपर्यंत या रस्त्यावरून चाललेल्या मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा नागरिकांनी अनुभवला.

राजधानीतील टपाल मुख्यालयासमोरील रस्त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हवेत फुगे सोडून मिरवणुकीचे उद्घाटन केले. त्यावेळी महापौर रोहित मोन्सेरात, खासदार सदानंद तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक यांच्यासह पर्यटन महामंडळ आणि पर्यटन खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

यंदाच्या कार्निव्हमध्ये गोंयकारपणाची गौरवशाली व वैभवशाली परंपरा दर्शविणारे एकापेक्षा सरस चित्ररथ पाहण्यास मिळाले. त्यात खास करून लक्षवेधी ठरला तो कदंब महामंडळाच्या जीडीएक्स 1 या पहिल्या बसचे प्रदर्शन करणारा चित्ररथ. त्याशिवाय पर्यावरण जतनाचा संदेश देणारे अन्य चित्ररथ, तसेच गोव्यातील पारंपरिक व्यवसाय दर्शविणारे पोदेर, खाजेकार, चणेकार, भाताची गिरण, मासळी विक्रेती यांचे चित्ररथ, वाहतुक सुरक्षेसंबंधी माहिती देणारा चित्ररथ आणि भरीस त्याशिवाय भारतीय नौदलाचे संचालन, पोलीस बँड आणि अन्य व्यावसायिक मिळून 40 ते 45 चित्ररथ सहभागी झाले होते.

त्याशिवाय पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये असंख्य कलाकारांनी भाग घेतला. मिरवणुकीदरम्यान या कलाकारांनी नृत्याचा अविष्कार घडविला. स्थानिकांसह देशी विदेशी पर्यटकांनी चित्ररथ मिरवणुकीत सहभाग घेऊन मनसोक्त आनंद लुटला. चित्ररथ आणि अन्य कलाकारांसमवेत सेल्फी काढण्यातही बहुसंख्य हौशे दंग असल्याचे पाहावयास मिळाले. आता मडगाव, वास्को आणि म्हापसा आदी ठिकाणी कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.