For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्लसनने गुकेशला हरवले, प्रज्ञानंद दुसऱ्या स्थानी कायम

06:15 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
कार्लसनने गुकेशला हरवले  प्रज्ञानंद दुसऱ्या स्थानी कायम
Advertisement

वृत्तसंस्था 

Advertisement

ओस्लो : येथील नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला मॅग्नस कार्लसन विद्यमान क्लासिकल विश्वविजेता डी. गुकेशवर दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतला आहे. या विजयामुळे हा तऊण भारतीय खेळाडू गुणतालिकेत तळाशी फेकला गेला आहे. दुसरीकडे, आर. प्रज्ञानंदने व्हिन्सेंट कीमरला आर्मागेडनमध्ये हरवून आपले दुसरे स्थान राखले आहे.

सात वेळा नॉर्वे बुद्धिबळ विजेता ठरलेल्या कार्लसनची स्पर्धेची सुऊवात सुस्त झाली होती. पण आता तीन पूर्ण गुण मिळवून 4.5 गुणांसह शेवटच्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर त्याने झेप घेतली. दुसरीकडे, या निकालामुळे निराश झालेला गुकेश एका बाजूच्या दरवाजातून शांतपणे बाहेर पडला, ज्यामुळे अनेक तऊण चाहते त्याच्या स्वाक्षरीसाठी वाट पाहत राहिले.

Advertisement

शुक्रवारच्या विश्रांतीच्या दिवसापूर्वी वेस्ली सोविऊद्धचा क्लासिकल गेम बरोबरीत सुटल्यानंतर आर्मागेडन टायब्रेकरमध्ये स्पर्धेतील आपला पहिला पराभव पत्करूनही अलीरेझा फिरौजा अव्वल स्थानी कायम राहिला आहे. फिरौजाने एक मौल्यवान गुण मिळवून आपले गुण 8.5 वर नेले आहेत आणि सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या प्रज्ञानंदवर 2.5 गुणांची भक्कम आघाडी कायम ठेवली आहे. अमेरिकन वेस्ली सो 5.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, जो कार्लसनपेक्षा एक गुण पुढे आहे, तर कीमर चार गुणांवर आहे. तळाशी विद्यमान विश्वविजेता गुकेश 3.5 गुणांसह आहे आणि या वर्षाच्या अखेरीस आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्हविऊद्ध विश्वविजेतेपद राखून ठेवण्यासाठी झटण्यापूर्वी या तऊण भारतीय खेळाडूसाठी ही स्पर्धा आणखी एक दु:स्वप्न ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी गुकेशविरुद्ध झालेल्या पराभवाच्या विपरित यावेळी कार्लसनकडून कोणतेही टेबल बडवणे किंवा नाट्यामय पद्धतीने ‘ओह माय गॉड’ म्हणणे असे प्रकार दिसले नाहीत. कारण या नॉर्वेजियन महान खेळाडूने काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना मिळालेल्या आघाडीचे निर्णायक विजयात रूपांतर केले. ‘आज मी खूप प्रेरित होतो असं मी म्हणणार नाही. सलग तीन दिवस खूप कमी वेळात अत्यंत खराब खेळल्यामुळे मी जरा थकून गेलो होतो. आज माझ्या फारशा अपेक्षा नव्हत्या, पण सुऊवातीला ज्या प्रकारे गोष्टी घडल्या त्यामुळे मी आनंदित आहे’, असे कार्लसन सामन्यानंतर म्हणाला.

दुसरीकडे, प्रज्ञानंद आणि कीमर या दोघांनीही एका निर्णायक ‘क्लासिकल’ सामन्यात विजयाच्या संधी गमावल्या. त्यानंतर भारतीय खेळाडूने अवघ्या 17 चालींमध्येच आर्मागेडन टायब्रेकर आपल्या नावी केला. महिला गटात दिव्या देशमुखला आपल्या पहिल्याच ‘आर्मागेडन’ पराभवाचा सामना करावा लागला. सलग तीन टायब्रेकर जिंकल्यानंतर तिला गतविजेती अॅना मुझीचुक हिच्यासमोर हार पत्करावी लागली. या पराभवामुळे विश्वचषक विजेती असलेली दिव्या दुसया क्रमांकावरून घसरली आहे आणि 5.5 गुणांसह ती संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर (तीन खेळाडूंमध्ये बरोबरी) पोहोचली आहे.

कोनेरू हम्पीचा संघर्ष मात्र कायम राहिला. तिला झू जिनर हिच्याकडून आणखी एका ‘आर्मागेडन’ सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि सहा खेळाडूंच्या या गटात ती शेवटच्या स्थानावर राहिली आहे. सात गुणांसह बिबिसारा असाउबायेव्हा आघाडीवर आहे. त्यानंतर मुझिचुक, दिव्या आणि झू प्रत्येकी 5.5 गुणांवर आहेत. विद्यमान महिला विश्वविजेती जू वेनजुन चार गुणांवर आहे, तर हम्पी तीन गुणांनी पिछाडीवर आहे.

-प्रज्ञानंद सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर

-दिव्या देशमुखला पराभवाचा धक्का

-कोनेरू हम्पीची पराभवाची मालिका कायम

-कार्लसनची शेवटच्या स्थानावरून चौथ्या स्थानी झेप

Advertisement
Tags :

.