स्पेनचा कार्लोस अल्कारेझ विजेता
वृत्तसंस्था/ मोनॅको
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील माँटे कार्लो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या 21 वर्षीय कार्लोस अल्कारेझने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना इटलीच्या मुसेटीचा पराभव केला.
या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात अल्कारेझने मुसेटीचे आव्हान 3-6, 6-1, 6-0 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणले. या अंतिम सामन्यात मुसेटीला दुखापत झाली होती. पण त्याने दुखापतग्रस्त स्थितीमध्ये पहिला सेट 6-3 असा जिंकून अल्कारेझला चकीत केले. त्यानंतर पुढील 2 सेट्समध्ये त्याच्या उजव्या पायाला झालेल्या दुखापतीतून तीव्र वेदना झाल्या. त्यामुळे तो या दोन्ही सेट्समध्ये केवळ औपचारीकता म्हणून खेळ करत होता. अल्कारेझने दुसरा आणि तिसरा सेट अनुक्रमे 6-1 आणि 6-0 असा जिंकत तब्बल 13 महिन्यांनंतर एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत पहिले जेतेपद मिळविले. अल्कारेझने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत मास्टर्स 1000 दर्जाच्या 6 स्पर्धा जिंकल्या आहेत. या जेतेपदामुळे 21 वर्षीय अल्कारेझ आता एटीपीच्या ताज्या मानांकनात दुसऱ्या स्थानावर झेप घेईल. अल्कारेझने उपांत्य सामन्यात आपल्या देशाच्या फोकिनाचा तर इटलीच्या मुसेटीने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.