For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्लोस अल्कारेझ, नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का

06:05 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
कार्लोस अल्कारेझ  नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का
Advertisement

अमेरिकन ओपन टेनिस : झान्डस्कल्प, मुचोव्हा, मेदवेदेव्ह, स्वायटेक, सिनेर, डी मिनॉर तिसऱ्या फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत दोन धक्कादायक निकाल पहावयास मिळाले. माजी चॅम्पियन स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला आणि महिलामधील दोन वेळची विजेती जपानची नाओमी ओसाका यांचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. अल्कारेझला नेदरलँड्सच्या बिगरमानांकित बोटिक व्हान डी झान्डस्कल्पने तर ओसाकाला झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाने पराभूत केले. याशिवाय डॅनील मेदवेदेव्ह, जेनिस सिनेर, अॅलेक्स डी मिनॉर, इगा स्वायटेक यांनी तिसरी फेरी गाठली बोटिक झान्डस्कल्पने अल्कारेझवर 6-1, 7-5, 6-4 अशी सरळ सेट्समध्ये अशी मात करीत त्याला अनपेक्षित धक्का दिला. अल्कारेझने प्रेंच ओपन व विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या आहेत. या पराभवामुळे त्याची

Advertisement

ग्रँडस्लॅममधील सलग 15 सामन्यांची विजयी मालिकाही खंडित झाली. महिला एकेरीत नाओमी ओसाकाच्या या स्पर्धेतील पुनरागमनाला दुसऱ्या फेरीतच ब्रेक लागला. कॅरोलिना मुचोव्हाने तिला 6-3, 7-6 (7-5) असे हरवित तिसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत मुचोव्हा 52 व्या स्थानावर आहे. ओसाकाने ही स्पर्धा 2018, 2020 मध्ये जिंकली होती. गेल्या वर्षी तिने या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. 2022 मधील ऑस्ट्रेलियन ओपनपासून तिने एकदाही ग्रँडस्लॅमची तिसरी फेरी गाठलेली नाही. अन्य एका सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने तिसरी फेरी गाठताना जपानच्या पात्रता फेरीतून आलेल्या इना शिबाहाराचा 6-0, 6-1 असा फडशा पाडला. तिची पुढील लढत पाव्हल्युचेन्कोव्हा किंवा इलिजाबेता कॉक्सिरेटो यापैकी एकीशी होईल.

मेदवेदेव्ह, सिनेर विजयी

पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात माजी चॅम्पियन डॅनील मेदवेदेव्हने हंगेरीच्या फॅबियन मारोझसानचा 6-3, 6-2, 7-6 (7-5) असा पराभव केला. पाचव्या मानांकित मेदवेदेव्हने ऑस्ट्रेलियन ओपन व इंडियन वेल्स ओपन स्पर्धा जिंकल्या असल्या तरी त्याला या स्पर्धेसाठी फेव्हरिट मानले जात नाही. तिसऱ्या फेरीत त्याची लढत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीशी होईल. अग्रमानांकित जेनिक सिनेरने अमेरिकेच्या अॅलेक्स मिचेल्सनचा 6-4, 6-0, 6-2 असा धुव्वा उडवित तिसरी फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाच्या दहाव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरने फिनलंडच्या ओटो व्हर्टानेनवर 7-5, 6-1, 7-6 (7-3) अशी मात केली. विम्बल्डनमधून माघार घेतल्यानंतर डी मिनॉर पहिलीच स्पर्धा खेळत आहे. झेक प्रजासत्ताकच्या टॉमस मॅकहॅकने सेबॅस्टियन कोर्दाचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपवताना 6-4, 6-2, 6-4 असा विजय मिळविला.

रोहन बोपण्णा-मॅथ्यू एब्डन दुसऱ्या फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठताना नेदरलँड्सच्या सँडर अॅरेन्ड्स व रॉबिन हॅस यांच्यावर 6-3, 7-5 अशी 64 मिनिटांच्या खेळात मात केली. मागील वर्षी बोपण्णा-एब्डन यांनी उपविजेतेपद मिळविले होते. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅमचे विद्यमान विजेत्या असणाऱ्या बोपण्णा-एब्डन या दुसऱ्या मानांकित जोडीची पुढील लढत अर्जेन्टिनाचा फेडरिको कॉरिया व स्पेनचा रॉबर्टो कार्बालेस बाएना या बिगरमानांकित जोडीशी होणार आहे.

Advertisement
Tags :

.