केरळनजीक समुद्रात बुडाले मालवाहू जहाज
24 जणांना वाचवले : धोकादायक सामग्रीची गळती होण्याची भीती : भारतीय नौदल, तटरक्षक दलाकडून उपाययोजना
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या किनाऱ्यानजीक 640 कंटेनर वाहून नेणारे ‘एमएससी एल्सा-3’ हे लायबेरियन मालवाहू जहाज समुद्रात बुडाले आहे. या दुर्घटनेमुळे सागरी पर्यावरणाला नुकसान पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. दुर्घटनेनंतर जहाजावर असलेल्या 24 कर्मचाऱ्यांना भारतीय नौदलाने वाचविले आहे. शनिवारी तटरक्षक दलाने 24 पैकी 21 कर्मचाऱ्यांना जहाजावरून सुरक्षितपणे बाहेर काढले होते. त्यानंतर उर्वरित तिघांसाठी बचाव मोहीम राबविली. मालवाहू जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये एक रशियन, फिलिपाईन्सचे 20 जण, दोन युक्रेनियन आणि एक जॉर्जियन नागरिक सामील आहे.
हे जहाज शुक्रवारी तिरुअनंतपुरम नजीकच्या विझिंजम बंदरावरून रवाना होत कोच्ची येथे जात होते. या जहाजाची लांबी 184 मीटर होती आणि यात एकूण 640 कंटेनर ठेवण्यात आले होते. यातील 13 कंटेनर धोकादायक रसायनांनी भरलले होते. यातील 12 कंटेनर्समध्ये कॅल्शियम कार्बाइड होते तर जहाजात 84.44 मेट्रिक टन डिझेल होते. जहाज 26 अंशापर्यंत झुकले होते आणि तत्काळ सहाय्य मागण्यात आले होते, जहाज स्थिर होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यात पाणी भरल्याने बुडाले असल्याचे तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे महानिरीक्षक भीष्म शर्मा यांनी सांगितले.

अन्य जहाजांसाठी धोकादायक
आयएनएस सुजाता या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने जहाजावरील तीन कर्मचाऱ्यांना वाचविले आहे. आयएनएस सुजताद्याप दुर्घटनास्थळी तैनात आहे. तर एमएससी एल्सा 3 हे ज्या कंपनीचे जहाज होते, त्या कंपनीचे अन्य जहाज तेथे पोहोचले आहे. भविष्यात मोठ्या संकटाची शक्यता पाहता तटरक्षक दलाने जहाजातून कोसळलेले कंटेनर समुद्रात तरंगत राहत अन्य जहाजांसाठी धोकादायक ठरू शकतात आणि हे कंटेनर किनाऱ्यावर पोहोचू शकतात असा इशारा दिला आहे. केरळच्या मुख्य सचिवांकडून आता या प्रकरणी उच्चस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे.
केरळचे किनारी क्षेत्र जैवविविधतेचे प्रमुख केंद्र असून एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. आमच्या टीमने प्रदूषण नियंत्रणाच तयारीला वेग दिला आहे. तसेच राज्य प्रशासनासोबत समन्वय ठेवला जात आहे. सध्या कुठल्याही प्रकारच्या इंधन गळतीची पुष्टी झालेली नाही. परंतु तटरक्षक दलाच्या विमानांना तेलगळतीवर देखरेख ठेवणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त करण्यात आले असून त्याद्वारे स्थितीचे आकलन केले जात असल्याचे तटरक्षक दलाने स्वत:च्या वक्तव्यात म्हटले आहे.
त्वरित पोलिसांना कळवा
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जर एखादा कंटेनर किंवा तेलगळती समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यास त्याला स्पर्श करू नका आणि त्वरित पोलिसांना कळवा असे जनतेला आवाहन केले आहे. हे कंटेनर किंवा रसायनं समुद्रामार्गे किनाऱ्यापर्यंत येऊ शकतात, यामुळे धोका वाढू शकतो असे प्राधिकरणाने म्हटले आहे. किनाऱ्यावरील काही हिस्स्यांमध्ये तेलाचे तवंग दिसू शकतात असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. तर जहाजामध्ये मरीन गॅस ऑइल आणि सल्फर इंधन तेल होते अशी पुष्टी तटरक्षक दलाने दिली आहे.