भारताच्या विकास दर अंदाजात केयर रेटिंग्जने केली घट
जीडीपी दर 6.5 टक्के राहणार : सार्वजनिक खर्चासह इतर कारणे कारणीभूत
वृत्तसंस्था/मुंबई
आर्थिक वर्ष 2025 साठी भारताचा जीडीपी दर 6.5 टक्के इतका असणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी केयर रेटिंग्ज यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी याच संस्थेने भारताचा विकासदर 6.8 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजामध्ये कंपनीने घट केली आहे.
सार्वजनिक खर्चामध्ये कपात आणि शहरी भागामध्ये मागणीत आलेली घट या कारणास्तव विकासदर कमी राहणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे. रेटिंग एजन्सी केयर रेटिंग्ज यांच्या मते, दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपी आकड्यांमध्ये कमालीची नरमाई दिसून आली. पहिल्या 6 महिन्यांमध्ये सार्वजनिक खर्चामध्येसुद्धा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे शहरातील ग्राहकांकडून मागणीमध्ये अपेक्षित वाढ दर्शवली गेली नाही. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन रेटिंग एजन्सीने आर्थिक वर्ष 2025 साठी भारताचा जीडीपी दर घटवून नव्याने 6.5 टक्के इतका राहणार असल्याचे म्हटले.