दिवसाढवळ्या लागलेल्या आगीत संपूर्ण कार जळून खाक; कबनुरातील प्रकार
इचलकरंजी / प्रतिनिधी
धावती कार अचानक बंद पडल्याने, रस्त्याकडेला पार्क केली. पार्क केलेल्या कारला अचानक आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण करुन कारला कवेत घेतल्याने, आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. ही कार हर्षद अरुण वाघमारे (रा. टोप, ता. हातकणंगले) यांच्या मालकीची असून, त्यांच्या कारला कबनूर (ता. हातकणंगले) गावानजीकच्या कोन्नूर पार्क येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे यांची नोंद पोलिसात झाली आहे.
हर्षद वाघमारे हे पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहेत. त्यांनी दोन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चुन नवीन किंमती कार खरेदी केली आहे. ते बुधवारी दुपारी चंदूर (ता. हातकणंगले) येथे कंपनीच्या कामानिमित्याने कार मधून जात होते. यावेळी त्यांची कार कबनूर गावालगतच्या कोन्नूर पार्क समोर अचानक बंद पडली. त्यामुळे त्यांनी कार पार्कमधील रस्त्यावर उभी केली. कार मधील पेट्रोल संपून कार बंद पडली असावी. या शक्यतेने ते मित्रासमवेत दुचाकीवरुन पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले. पेट्रोल घेवून येताच त्यांना कार मधून धूर बाहेर येवू लागल्याचे दिसून आले. त्यांनी कारचा दरवाजा उघडून धूर कोठून येतो आहे. यांची पाहणी करु लागले. तोपर्यंत कारच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाला बाहेर येवू लागल्या. त्यांनी प्रसंगासावधान राखून कारपासून बाजूला झाले. या घडल्या घटनेची माहिती पोलिसांना आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानानी आग त्वरीत आटोक्यात आणली. पण तोपर्यंत संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली. त्यामुळे घटनास्थळी फक्त कारचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला.