महांतेशनगरातून चोरलेली कार हैदराबादमधून घेतली ताब्यात
दोघा चोरट्यांपैकी एकाच्या आवळल्या मुसक्या
बेळगाव : दहा दिवसांपूर्वी महांतेशनगर येथून एका क्रेटा कारची चोरी करण्यात आली होती. कारमधून आलेल्या दोघा जणांनी घरासमोर उभी केलेली कार चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. बेळगावातून चोरलेली कार हैदराबादमध्ये सापडली आहे. या प्रकरणी आंध्रप्रदेशमधील एकाला अटक करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबर रोजी महांतेशनगर येथून चोरण्यात आलेल्या क्रेटा कारचा शोध घेण्यात माळमारुती पोलिसांना यश आले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.
तपासासाठी खास पथक
या प्रकरणाच्या तपासासाठी माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, उपनिरीक्षक पी. एम. मोहिते आदींच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने हैदराबादमध्ये कार ताब्यात घेतली आहे. वीरा दुर्गाप्रसाद चिट्टीबाबू (वय 47) राहणार बिडी कॉलनी, एलुरू, ता. जि. एलुरू, आंध्रप्रदेश असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हैदराबादमधील पेद्दंबरपेठ विभागातील हयातनगरमध्ये क्रेटा कारसह वीराला अटक करण्यात आली आहे. चोरीसाठी त्याच्यासोबत बेळगावला आलेला त्याचा मित्र संगेपू चक्रधर, राहणार हयातनगर, हैदराबाद हा फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.