For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सडावाघापूर रस्त्यावर कार 300 फूट दरीत कोसळली

10:41 AM Jul 10, 2025 IST | Radhika Patil
सडावाघापूर रस्त्यावर कार 300 फूट दरीत कोसळली
Advertisement

पाटण :

Advertisement

पाटण ते सडावाघापूर या रस्त्यावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गावर टेबल पॉईंटच्या ठिकाणी चारचाकी कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट 300 फूट खोल दरीत गेली. या अपघातात चालक साहिल अनिल जाधव (वय 20, रा. गोळेश्वर, कराड) हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलिसात झाली आहे.

याबाबत पाटण पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सडावाघापूर याठिकाणी उलटा धबधबा पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक येथे जात असतात. पाटणपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पाटण-सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गाच्या मधोमध सपाटीला पर्यटकांसाठी टेबल पॉईंट म्हणून पर्यटनाचे ठिकाण आहे. या टेबल पॉईंटच्या दोन्ही बाजूला खोलवर दरी आहे. याठिकाणी फोटोसेशनसाठी अनेक पर्यटक थांबत असतात.

Advertisement

बुधवार 9 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास साहिल अनिल जाधव (वय 20. रा. गोळेश्वर, ता. कराड) हे आपल्या मित्रांच्या समवेत चारचाकी (एम. एच. 50. एक्स. 5859) या गाडीतून पर्यटनासाठी आले होते. टेबल पॉईंट ठिकाणी चहा घेतल्यानंतर मित्र फोटो काढण्यात व्यस्त होते. सायंकाळी 4.15 च्या सुमारास चालक साहिल जाधव गाडी चालू करत असताना गवतावरून गाडी घसरल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटून ते 300 फूट खोल दरीत गाडीसह कोसळले.

यावेळी उपस्थितांनी तात्काळ पाटण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर हे आपले कर्मचारी संतोष कुचेकर, राजेंद्र मोहिते, होमगार्ड आकाश चव्हाण, दीपक मिसाळ आदी टीमसोबत अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याच परिसरात असलेल्या सुरूल, येथील किंगमेकर अॅकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीने तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गाडीतील जखमी युवक साहिल जाधव याला झोळीतून वर काढण्यात आले. यावेळी परिसरात बकरी चारण्यासाठी गेलेला युवक मंगेश जाधव (म्हावशी) याने सदर गाडीचा दरवाजा तोडला.

गंभीर जखमी साहिल जाधव याला उपचारकरिता सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे पाठवण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर करत आहेत.

Advertisement
Tags :

.