दिल्ली स्फोटाशी संबंधित कार ताब्यात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली स्फोटाशी संबंधित आणखी एक कार हरियाणाच्या पोलिसांनी पकडली आहे. ही लाल रंगाची फोर्ड कार दिल्ली स्फोटाच्या घटनेपासूनच चर्चेत होती. या कारमध्येही स्फोटके भरलेली आहेत, अशी माहिती प्राप्त झाल्यामुळे या कारचा शोध सोमवारी रात्रीपासूनच केला जात होता. ही कार हरियाणा राज्यात फरीदाबाद जिल्ह्यात खानदावाली खेड्यात पार्क केलेल्या स्थितीत आढळली आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेतली असून तिची तपासणी करण्यात आली. तिच्यात स्फोटके आढळून आली नाहीत. तथापि. तिच्या मालकाचा शोध घेतला जात आहे.
डीएल 10 सीके 0458 या क्रमांकाची ही कार दिल्ली स्फोटातील सूत्रधार उमर उन् नबी याच्याच मालकीची आहे. या कारची नोंद नबी याच्याच नावावर आहे. ही कार अल् फलाह विद्यापीठापासून 12 किलोमीटर अंतरावरील गावात पार्क केलेल्या स्थितीत आढळली आहे. हे विद्यापीठ गेल्या काही काळापासून दहशतवाद्यांचा अ•ा बनले आहे, अशी चर्चा आहे. या विद्यापीठात घडणाऱ्या सर्व हालचालींवर हरियाणा पोलिसांनी सूक्ष्मपणे लक्ष ठेवले आहे. दिल्ली स्फोटाशी संबंधित सर्व डॉक्टर्स याच विद्यापीठामध्ये काम करणारे आहेत, अशी माहिती आहे.
दोन कार्समुळे संशय
दिल्ली स्फोटासाठी उपयोगात आणलेली ह्युंदाई कार आणि ही लाल रंगाची फोर्ड कार या दोन्ही वाहनांचा संबंध दहशतवाद्यांशी आणि दिल्ली स्फोटाशी आहे. या कारमधूनही स्फोटकांची ने आण करण्यात येत होती, असा पोलिसांचा संशय आहे. स्फोट झाला तेव्हा नबी हा ती कार चालवत होता. त्यामुळे स्फोटात तो ठार झाला आहे, असे मानले जात आहे. तथापि, यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बुधवारी सापडलेल्या लाल फोर्ड कारमध्ये पोलिसांना काही स्फोटकांचे तुकडे सापडल्याचे अनधिकृत वृत्त आहे. मात्र त्याला दुजोरा नाही.
कारच्या विक्रेत्याचा शोध
उमर उन् नबी याने ही लाल रंगाची फोर्ड कार कोणाकडून विकत घेतली, याची चौकशीही पोलिस करीत आहेत. त्याने ही कार रीतसर शोरुममध्ये जाऊन खरेदी केली की ती अन्य कोणा खासगी व्यक्तीकडून खरेदी केली आहे, ही माहिती पोसि संकलीत करीत आहेत. या कारमध्ये काही कागदपत्र सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या दिल्लीत प्रत्येक स्थानी वाहने तपासण्यात येत आहेत.