कारची ट्रकला जोरदार धडक, महिला डॉक्टर ठार
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ क्रॉसनजीक घटना : दोघे जखमी, मृत महिला मुडलगीची
बेळगाव : भरधाव कारने समोरील ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील महिला डॉक्टर जागीच ठार तर दोघे जण जखमी झाले. मंगळवार दि. 4 रोजी सकाळी 7 च्या दरम्यान पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ क्रॉसनजीक हा अपघात घडला आहे. आशा भिमाप्पा कोळी (वय 32, रा. संगनकेरी, ता. मुडलगी) असे मयत डॉक्टर महिलेचे नाव असून तिचा पती डॉ. भिमाप्पा कोळी (वय 38) यांच्यासह चालक महेश पुंडलिक खोत (रा. घटप्रभा) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची नोंद हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, डॉ. आशा आणि डॉ. भिमाप्पा हे दोघे पती-पत्नी मंगळवारी सकाळी 7 च्या दरम्यान केए 49, एम 8883 या आपल्या कारमधून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून धारवाडकडून बेळगावला येत होते. तर महेश पुंडलिक खोत हा कार चालवत होता. महामार्गावरून बडेकोळमठ क्रॉसनजीक असलेल्या
कॅटलवॉक ब्रिजजवळ आल्यानंतर भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे समोरून जाणाऱ्या टीएन 34, झेड 2016 या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात कारचालकाच्या बाजूच्या शीटवर बसलेल्या डॉ. आशा या जागीच ठार झाल्या. तर पाठीमागील शिटवर बसलेले त्यांचे पती भिमाप्पा हे देखील गंभीर जखमी झाले. तसेच चालक महेश देखील जखमी झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. ही माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासह अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटवून वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. निष्काळजीपणे कार चालविल्याप्रकरणी चालक महेश खोत याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.