For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन् रेल्वेफाटकामध्येच अडकली कार

10:57 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
अन् रेल्वेफाटकामध्येच अडकली कार
Advertisement

दुसऱ्या रेल्वेगेटजवळ सातत्याने होतेय वाहतूक कोंडी

Advertisement

बेळगाव : शहरामध्ये अमर्यादित संख्येने वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातही दुसऱ्या रेल्वेगेटजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीने तर नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी याच वाहतूक कोंडीमध्ये रेल्वेफाटक खाली येत असतानाच एका वाहनचालकाने आपली चारचाकी पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुर्दैवाने तेवढ्यात फाटक बंद झाले आणि ही कार मध्येच अडकली. दुसऱ्या रेल्वेगेटजवळ सातत्याने वाहतूक कोंडी होत आहेच. शिवाय रेल्वे क्रॉसिंगमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना बराच वेळ ताटकळत थांबावे लागते. तातडीने कोठेही जायचे झाल्यास हा मार्ग त्यांना उपयोगी ठरत नाही. एकतर वळसा घालून उ•ाणपुलावरून जावे लागते. त्यामुळे पुन्हा वेळ खर्ची होतो.

रेल्वेगेट बंद झाल्यास चारही बाजूंने कोंडी

Advertisement

मात्र, सतत रेल्वे येण्याच्या वेळी गेट बंद झाल्याने चारही बाजूंनी वाहतूक कोंडी होते. त्यात या वाहतुकीला कोणतीच शिस्त नाही. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येक जण आपले वाहन पुढे दामटतो आणि नेमकी गेटावरच बरीच गर्दी होऊन कोणालाच सुरळीतपणे मार्गक्रमण करता येत नाही. वास्तविक, एका बाजूने पलीकडून येणाऱ्या वाहनांनी आणि दुसऱ्या बाजूने दुसरीकडून येणाऱ्या वाहनांनी वाहने नेल्यास ते सोयीचे ठरते. परंतु, प्रत्येकालाच घाई असल्याने सर्वजण वाहने आणून फाटकाजवळ लावतात. परिणामी फाटक उघडले की गर्दी होते.

वाहतूक कोंडीची समस्या अधिकाधिक जटिलच

या ठिकाणी वाहतूक पोलीस आहेत. परंतु, चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना नियंत्रित करताना त्यांचीही दमछाक होते. जो तो दुसऱ्याला वाहतुकीचे नियम सांगतो, पण स्वत: मात्र त्याचे उल्लंघन करतो. दिवसेंदिवस दुसऱ्या रेल्वेगेटावरील वाहतूक कोंडीची समस्या अधिकाधिक जटिल होत चालली आहे. महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक-दोन वेळा या मार्गाची पाहणी करून अथवा प्रत्यक्ष वाहन चालवून अनुभव घ्यावा. म्हणजे त्यांना नागरिकांच्या गैरसोयीची कल्पना येईल आणि किमान पर्यायी मार्गाचा ते विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.